पुणे- सातारा मार्गावर सर्वाधिक गरज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागासाठी दोन नव्या डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) लोकल देण्यात आल्या आहेत. मात्र, या लोकल नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार याचे अद्यापही नियोजन नसल्याने दोन्ही लोकल सध्या यार्डात पडून आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाचा विचार केल्यास पुणे- सातारा दरम्यानच्या प्रवासासाठी सध्या मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. प्रवासी आणि रेल्वे या दोघांचाही फायदा लक्षात घेता याच मार्गावर नव्या डेमू सुरू व्हाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

लोहमार्गाचे विद्युतीकरण न झालेल्या भागामध्ये ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) या सर्वमान्य झालेल्या लोकल गाडय़ांच्या धर्तीवर प्रवाशांना सेवा देण्याच्या दृष्टीने डेमू लोकल सोडल्या जातात. पुण्यासाठी यापूर्वी प्रत्येकी दहा डब्यांच्या तीन नव्या डेमू लोकल देण्यात आल्या होत्या. पुणे विभागाने पंधरा डब्यांच्या दोन डेमू लोकल करून त्या पुणे ते दौंड, बारामती या मार्गावर सुरू केल्या. पुणे- दौंड मार्गाचे विद्युतीकरण झाले असल्याने या मार्गावर ईएमयू लोकल सुरू करण्याची मागणी होती. मात्र, विजेवरील लोकल सुरू करण्यासाठी विविध स्थानकावरील फलाटांच्या रचनेत बदल करावे लागणार आहेत. त्यासाठीचा निधीही रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. ईएमयू लोकल सुरू करण्यासाठी नियोजित कामे झाल्यास पुणे- दौंड मार्गावर ही लोकल सुरू होऊ शकेल. तूर्त या मार्गावर डेमू लोकलची सेवा सुरू आहे. ४ ऑगस्टला पुणे विभागाला दोन नव्या डेमू लोकल मिळाल्या. मात्र, अद्यापही त्यांच्या सेवेबाबतचे नियोजन रेल्वेकडे नाही. मागे पुणे- दौंड मार्गासह पुणे- सातारा मार्गावरही डेमू गाडय़ांची चाचणी घेण्यात आली होती. दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर दौंड मार्गावर डेमू सुरू झाली. रेल्वेच्या पुणे विभागात मोडणाऱ्या पुणे- लोणंद- फलटण- सातारा या पट्टय़ातून दररोज शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

पुणे विभागाला दोन नव्या डेमू लोकल मिळाल्या आहेत. या गाडय़ा कोणत्या मार्गावर सुरू होणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्या कोणत्या मार्गावर सुरू कराव्यात, याबाबत मागणीचा प्रस्ताव आलेला नाही. रेल्वेकडून या गाडय़ांच्या नियोजनाबाबत योग्य वेळी माहिती जाहीर केली जाईल.

मनोज झंवर, मध्य रेल्वे पुणे विभाग, जनसंपर्क अधिकारी

प्रवाशांची गरज ओळखून या गाडय़ा देण्यात आल्या आहेत. चेन्नईहून विनाअडथळा डेमू पुण्यात पोहोचल्या. त्यामुळे त्यात कोणताही तांत्रिक दोष नाही. रेल्वेने वेळ न दवडता त्या प्रवाशांच्या सेवेत सुरू कराव्यात. पुणे- सातारा दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रस्ताव नाही म्हणून काहीच न करणे योग्य नाही. प्रवाशांची गरज आणि रेल्वेचा फायदा ओळखून या गाडय़ा तातडीने सुरू व्हाव्यात.

हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप, अध्यक्षा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demu local issue pune satara railway transport
First published on: 17-08-2017 at 03:24 IST