ऊन, वारा, पाऊस.. पंढरीची खडतर वाट.. पण तुकोबारायांची संगत अन् विठोबाला भेटण्याच्या आर्त ओढीमुळे कशाचीही तमा न बाळगता अखंड भक्तिकल्लोळ करणाऱ्या लाखो वैष्णवांच्या साक्षीने शनिवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
दुष्काळाचे सावट दूर होऊन पाऊस सुरू झाल्याने चेहऱ्यावर आनंदाची लकेर घेऊन देहूत आलेल्या वारकऱ्यांमुळे नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते. प्रस्थान सोहळ्यासाठी पहाटेपासूनच लगबग सुरू झाली होती.

परंपरेप्रमाणे काकड आरतीने सोहळ्याची सुरुवात झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटे साडेपाच वाजता महापूजा झाली. संस्थानचे अध्यक्ष रामदास महाराज मोरे या वेळी उपस्थित होते. नारायण महाराज समाधी मंदिरातील पूजेनंतर सकाळी नऊ वाजता संभाजी महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. ‘पहा ती गवळण, तव ती पालथी दुधानी’ या अभंगावर त्यांनी कीर्तन केले. त्यानंतर पाथ्रुडकर दिंडीने संत तुकारामांच्या पादुका इनामदार वाडय़ात आणल्या. तेथे पूजा झाल्यानंतर परंपरेनुसार म्हसलेकरांनी पादुका डोक्यावर घेतल्या व त्या मुख्य मंदिराच्या सभामंडपात आणल्या.
मुख्य मंदिरामध्ये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार बाळा भेगडे, विलास लांडे यांच्या उपस्थितीत षोडशोपचार पूजा करण्यात आली. मंत्रघोषानंतर संस्थानच्या वतीने दिंडीकरी व मानकऱ्यांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघाली. प्रदक्षिणा पूर्ण करून मुख्य मंदिरातून पालखी इनामदार वाडय़ात मुक्कामासाठी पोहोचली. रविवारी पालखी देहूकरांचा निरोप घेऊन आकुर्डी मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.