प्रकाश खाडे
जेजुरी : संत ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीने शनिवारी (२५ जून) आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले. दुपारी दीड वाजता सासवड येथील संत सोपानदेवांच्या समाधी मंदिराजवळ हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवल्यानंतर सोहळ्याने पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

वैकुंठीचे सुख नलगे पै चित्ती। हरी हेची मुर्ती विठ्ठल ध्यावो ॥
याचेने स्मरणे कैवल्य साचार । सोपान विचार हरि जपे ॥

टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा माउली तुकाराम व संत सोपान देवांचा जयघोष करीत वारकरी आनंदाने नाचू लागले. या वेळी आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड,तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, सासवडचे मुख्याधिकारी निखील मोरे आदी उपस्थित होते.आज पहाटे चार वाजता मंदिरात समाधीची काकडआरती,पवमान अभिषेक,महापूजा आदी कार्यक्रम झाल्यानंतर वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी रांग लागली. दुपारी ज्ञानेश्वर माउलींकडून परंपरागत मानाचा नैवेद्य आल्यावर कीर्तन झाले. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट,संत सोपानकाका बँक व अन्य संघटनांकडून आणि सासवड नगरपालिका यांच्याकडून दिंडीप्रमुखांचे सत्कार करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी सासवड नगरीतून खांद्यावर नेऊन जेजुरी नाक्यावर फुलांनी सजविलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली व सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यामध्ये राज्याच्या विविध भागातील ९७ मानाच्या दिंड्या आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड.त्रिगुणमहाराज गोसावी यांनी दिली. पालखी सोहळ्याचा शनिवारी पांगारे येथे मुक्काम आहे. तसेच श्री संत योगीराज चांगा वटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचेही सासवडमधून दुपारी दीड वाजता प्रस्थान झाले .पालखीच्या पुढे व मागे मानाच्या दिंड्या आहेत. पारगाव मेमाणे, यवत,इंदापूरमार्गे सोहळा पंढरपूरला पोचणार आहे.