पिंपरी : हिंजवडी गावठाणातून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात मंदिरांवर कारवाई करू नये, अशी मागणी करणारे हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. धरणे करताना मंदिरे जातात की नाही? जवळचे आयटी पार्क पुण्यातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. याचे तुम्हाला काही पडले नाही, असे त्यांनी सुनावले.

राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडीमधील वाढती वाहतूककोंडी, नागरी समस्यांची पाहणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी (शनिवारी) पहाटे सहा वाजता केली. दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे का, त्यानुसार विकासकामांना सुरुवात केली आहे का, याची पवार यांनी पाहणी केली. आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील या वेळी उपस्थित होते.

हिंजवडीतील समस्यांची पाहणी करून जाताना अजित पवार मोटारीत बसत होते. त्याच वेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर तिथे आले. हिंजवडी गावठाणातून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात मंदिरांवर कारवाई करू नये, पर्याय भरपूर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सरपंच जांभूळकर करीत होते. त्यावर पवार यांनी, ‘धरणे करताना मंदिरे जातात की नाही, तुम्हाला काय सांगायचे ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचे ते मी करतो. हिंजवडीचे आयटी पार्क पुणे, महाराष्ट्रातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. याचे तुम्हाला काही पडले नाही. मी कशाला पहाटे सहा वाजता येऊन पाहणी करीत आहे. मला कळत नाही का? माझेही लोक आहेत. परंतु, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही’, असे पवार म्हणाले.

माझा आवाज थोडा मोठा आहे. मी काही बोललो, की बातमी केली जाते. अजित पवारांनी अमक्याला झापले. मी काही कोणाला झापायला आलो नाही. सर्वांबाबत आदर असून, सर्वजण सहकार्य करीत आहेत.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक या रस्त्यालगत गणपती, पांडुरंगाचे मंदिर, शाळा, दशक्रिया विधी घाट आहे. हा रस्ता ३० ऐवजी १८ मीटर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. पण, प्रशासन ऐकत नाही, हे अजित पवार यांना सांगत होतो. वाकड रोड ३० मीटरच राहू द्यावा. ३६ मीटर करू नये. -गणेश जांभूळकर,सरपंच, हिंजवडी