पिंपरी : ‘शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृहविभागासोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. देशात पिकणारा माल आपल्याच लोकांनी खरेदी करावा, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या असून अमेरिकन कराचा फटका बसू नये, यासाठीचे नियोजन सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे द्राक्ष परिसंवाद वार्षिक अधिवेशन रविवारी वाकड येथे पार पडले. पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्री दत्ता भरणे, आमदार शंकर मांडेकर, केंद्रीय फलोत्पादन उपसचिव संजय सिंह, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक कौशिक बॅनर्जी, कृषी आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण, खजिनदार शिवाजीराव पवार या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील शेतकरी द्राक्ष उत्पादनातून राज्याच्या समृद्धीत मोलाचा वाटा उचलत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तंत्रज्ञान अवलंबणे ही काळाची गरज आहे. विषमुक्त अन्नधान्य ही भविष्याची दिशा आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार व कृषी मंत्रालय यांच्याकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.
‘काही निघू देऊ नका, कृषिमंत्र्यांना सूचना’
‘कृषिमंत्री दत्ता भरणे यांची चांगली शेती आहे. भरणे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. पूर्वीच्या कृषिमंत्र्यांबाबत सातत्याने काही तरी निघत होते. त्यामुळे भरणे यांना शोधून काढले. आता तुम्ही काही निघू देऊ नका,’ अशी सूचना पवार यांनी भरणे यांना केली.
दिल्ली आवडत नाही’
‘मला दिल्लीला राहायला आवडत नाही. १९९१ मध्ये खासदार झाल्यानंतर सहा महिन्यांतच तिथून आलो. आपला महाराष्ट्र बरा आहे,’ असेही अजित पवार म्हणाले.
आधी द्राक्ष बागायतदार, नंतर कृषिमंत्री
मी आधी द्राक्ष बागायतदार आहे, नंतर कृषिमंत्री आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. द्राक्ष उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन आवश्यक ते निर्णय घेतले जातील. शेतमालाच्या मार्केटिंगसाठी कृषी विभाग सतत प्रयत्नशील आहे, असे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.
द्राक्ष बागायदारांच्या मागण्या
बेदाण्याच्या तस्करीला पायबंद घालावा. शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा. एक रुपयात द्राक्ष पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी. शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा, अशा विविध मागण्या राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केल्या.
लाडक्या बहिणींबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. महिला बाल कल्याणच्या मंत्र्यांशी बोलणार आहे. निधीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लाडक्या बहीण योजनेचा लाभ नको तेही घेत आहेत. याची छाननी करण्याबाबत बैठक घेतली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.