पिंपरी : ‘राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. अन्य राजकीय पक्षांचे नेते प्रगल्भ असून, ते निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यानुसार त्यांनी दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन त्यांनी निर्णय घ्यावा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

चाकण येथे अजित पवार यांनी सोमवारी चाकण येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मोठे सोहळे रद्द होत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षासह काही पक्षांकडून दसरा घेण्यात येणार असल्याबाबत पवार म्हणाले, ‘मला याबाबत काही बोलायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रगल्भ आहेत. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन त्यांनी निर्णय घ्यावा.’

‘सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते. शेतीचे प्रचंड नुकसान होते. जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आता तातडीची पाच हजार रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे’, असेही पवार म्हणाले.

पाऊस थांबताच चाकणमधील कामांना गती

चाकणमध्ये मोठे ट्रक, कंटेनरमुळे वाहतुकीची कोंडी होते. रस्ते रुंद करण्यासाठी नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करावे लागत आहे. चाकणमधील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. पाऊस थांबला की पुन्हा रस्त्याची कामे सुरु होतील. पाऊस असताना शक्य ती कामे केली आहेत. अनेक कामे पूर्ण झाली आहेत. पावसाने विश्रांती घेताच प्रलंबित कामांना गती दिली जाईल. चाकणला कोंडीमुक्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सोनसाखळी घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात

पुणे भागात काही लोकांची ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते. हे अती होत आहे. सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य पवार यांनी केले.

‘लोहमार्ग केंद्र सरकार करणार’

तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरळीकांचन लोहमार्ग पूर्वी राज्य सरकार करणार होते. मात्र, आता रेल्वे मंत्रालयाने राज्य शासनाने हा मार्ग करायचा नाही, असे कळविले आहे. त्यामुळे हा मार्ग राज्याला करता येणार नाही. केंद्र सरकार हा मार्ग करणार आहे. प्रकल्प त्यांच्या ताब्यात गेला आहे. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून होईल, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळाला पाहिजे. त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री