पुणे : शहरात मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही टँकरच्या संख्येत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ टँकर फेऱ्यांद्वारे पाणी देण्यात आले होते. तर, एप्रिलमध्ये कडक उन्हाळा असतानाही टँकरफेऱ्यांची संख्या ६० ने घटली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ४७ हजार ८३६ टँकरफेऱ्यांची नोंद पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६ हजार २३३ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. २०२४-२५ वर्षामध्ये एप्रिल महिन्यात पुणे शहरातील विविध भागांमध्ये टँकरच्या ४१ हजार ६०३ फेऱ्या झाल्या होत्या. तर, एप्रिल २०२५-२६ या वर्षात ही संख्या ४७ हजार ८३६ इतकी झाली आहे. मार्च २०२५ मध्ये शहरातील विविध भागांमध्ये ४७ हजार ८९६ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील टँकरफेऱ्यांच्या नोंदीतून ही बाब समोर आली आहे.
शहराचा वाढत असलेला विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी त्यामुळे दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये टँकरची संख्या वाढत असते. दरवर्षी टँकरच्या फेऱ्यांमध्ये मार्च पेक्षा एप्रिल महिन्यात आणि एप्रिलपेक्षा मे महिन्यात वाढ होते. मात्र यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढवून देखील मार्च महिन्याच्या तुलनेत टँकर फेऱ्यांची संख्या ६० ने कमी झाल्याची नोंद पाणीपुरवठा विभागाकडे झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
टँकरचालकांकडून लूट
वाढत्या शहरीकरणामुळे टँकरची मागणी वाढली आहे. अनेक मोठ्या सोसायट्यांमधील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकरने पाणी घ्यावे लागते. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये पाण्याची मागणी वाढल्याने टँकरची संख्याही वाढते. याचा फायदा घेत अनेक खासगी टँकरचालक मनमानी शुल्क आकारून नागरिकांची लूट करतात. टँकरसाठी किती शुल्क घ्यावे, यावर कोणतेही नियंत्रण महापालिकेचे नाही. त्यामुळे टँकरचालकांकडून भरमसाठ शुल्क आकारून अडवणूक केली जाते, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये उन्हाचा चटका वाढवूनही टँकरफेऱ्यांमध्ये घट झाली आहे. मार्च महिन्यात टँकरची मागणी वाढली होती. शहरातील सर्व भागांमध्ये पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका