गुजरातमधील साबरमती नदीचा परिसर ज्या पद्धतीने विकसित करण्यात आला आहे, त्याप्रमाणे पुण्यातील मुळा व मुठा नदीकाठचा परिसर विकसित करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेतर्फे तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. पुण्यातील नदीसुधारणेबाबत न्यायालयात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याबाबत सर्व घटकांना विचारात आणि विश्वासात घेऊन नदीसुधारणेची व परिसर विकासाची कामे केली जातील, अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली.
मुळा-मुठा नदीकाठ विकसित करण्याच्या दृष्टीने केंद्राकडून एक खास पथक पुण्यात पाठविण्यात आले आहे. या पथकापुढे झालेल्या सादरीकरणात आयुक्तांनी नदीसुधारणेसंबंधीची माहिती दिली. महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, सभागृहनेता शंकर केमसे, काँग्रेसचे गटनेता व विरोधी पक्षनेता अरिवद िशदे, आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते.
या पथकाने साबरमती नदीकाठ परिसर सुधारणेचे लक्षणीय काम केले आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नदीकाठ सुधारणा योजना हाती घेतली आहे. त्यासाठी सल्लागारांना तीन कोटी रुपये दिले जाणार आहेत. पुणे शहरातून सतरा किलोमीटर लांबीचा मुळा नदीचा प्रवाह आहे तसेच १२ किलोमीटर लांबीचा मुठा नदीचा प्रवाह आहे. तांत्रिक पद्धतीने नदीचे संरक्षण करणे, नदीकाठ सुधारणा करणे, प्रदूषण कमी करणे, नदीकाठ संवर्धन आणि सुशोभीकरण आदी योजना या प्रकल्पात हाती घेण्यात येणार आहेत.
नदीबाबतचा नागरिकांचा दृष्टिकोन तयार करणे, विविध कल्पना राबवणे यासाठी महापालिकेकडून सल्लागार नेमण्यात येणार आहेत. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी महापालिकेच्या चालू वर्षांतील अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सल्लागार नियुक्तीबाबतचा प्रस्तावही लवकरच स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, या सादरीकरणानंतर काँग्रेसकडून आक्षेप नोंदविण्यात येऊन बठकीतून उपमहापौर आबा बागूल बाहेर पडले. नदीसुधारणा झालीच पाहिजे. मात्र हरित लवाद आणि पर्यावरणात काम करणाऱ्या संस्थांकडून नदीची पूरनियंत्रण रेषा, नदीतील रस्ता व उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे याबाबत विचार झाला पाहिजे, असे मत उपमहापौर बागूल यांनी व्यक्त केले.