भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले केले. त्याचवेळी फडणवीस यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली. यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढले तर मला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांनी फडणवीसांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार का असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का असा सवाल केला. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर आले असताना बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे? मी महाराष्ट्रात तुम्हाला नको आहे का?” यावेळी फडणवीसांना तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होणार का अशीही विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं की, मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही.

अमित शाहांचा मुंबई दौरा, राज ठाकरेंच्याही घरी जाणार का?

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमित शाह दरवर्षी गणपतीला मुंबईत येतात. ते या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतात. ते येणार असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की आपली बैठकही झाली पाहिजे. त्यानंतर ते एका शाळेचं उद्घाटनही करण्यास जाणार आहेत. एवढाच त्यांचा कार्यक्रम आहे. या व्यतिरिक्त त्यांचा कुठलाही कार्यक्रम नाही. कुठलीही पतंगबाजी करू नये.”

पुणे मनपाचं विभाजन होणार का?

भाजपा नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभाजनाची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर पुणे मनपाचे दोन भाग होणार का यावर चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी दोन महापालिकांबाबत भूमिका घेतल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

“नवनवीन वादाचे विषय कशाला काढता?”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नवनवीन वादाचे विषय कशाला काढता? जेव्हा पुणे महानगरपालिकेचं विभाजन करायचं तेव्हा करू. आज तरी राज्य सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो हे खरं आहे. मात्र, आज तरी असा प्रस्ताव आलेला नाही.”

“वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे,” असं म्हणत फडणवीसांनी अशी मागणी करणाऱ्यांना सूचक टोला लगावला.

“अशोक चव्हाणांबाबतचं वृत्त चुकीच्या आधारावर”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त चुकीच्या आधारावर आहे. अशी कोणतीही परिस्थिती नाही. अशोक चव्हाण आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही एकत्र काम करत आहोत.

हेही वाचा : पुण्याचं विभाजन करून दोन महापालिका होणार? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“त्या भेटीचा असा अर्थ लावणं योग्य नाही”

“अशोक चव्हाण सध्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रियपणे सहभागी होत आहेत. ते गणपती दर्शनाच्या निमित्ताने मित्राकडे गेले. तिथे दुसऱ्या नेत्यांची भेट झाली. म्हणून त्याचा असा अर्थ लावणं योग्य नाही. अशोक चव्हाण आणि आम्ही काँग्रेसची बांधणी करण्यासाठी काम करत आहोत आणि काम करत राहू,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.