भाजपा नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभाजनाची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर पुणे मनपाचे दोन भाग होणार का यावर चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी दोन महापालिकांबाबत भूमिका घेतल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन, इलेक्ट्रिक बस लोकार्पण सोहळ्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नवनवीन वादाचे विषय कशाला काढता? जेव्हा पुणे महानगरपालिकेचं विभाजन करायचं तेव्हा करू. आज तरी राज्य सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो हे खरं आहे. मात्र, आज तरी असा प्रस्ताव आलेला नाही." "वादाचे विषय काढू नका" "वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे," असं म्हणत फडणवीसांनी अशी मागणी करणाऱ्यांना सूचक टोला लगावला. याशिवाय फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, "मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे? मी महाराष्ट्रात तुम्हाला नको आहे का?" चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते? "शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे," अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले, "वाढत्या विस्ताराने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन महापालिका करण्याची माझी भूमिका राजकीय नाही. मात्र कामकाजाच्या दृष्टीने सुलभता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक आहे. दोन महापालिका झाल्यास समस्या तातडीने सुटतील." हेही वाचा : “पुण्याला कुणीच वाली राहिला नाही”, नीलम गोऱ्हेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले… गेल्या पाच वर्षात शहराच्या हद्दीत एकूण ३४ गावांचा टप्याटप्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहराची भौगोलिक हद्दवाढ झाली असून पुणे देशातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधा पुरविण्यावर महापालिकेला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी दोन महापालिकांची आवश्यकता अधोरेखीत केली.