पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते. अशा परिस्थितीत पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घातले आहे.

सिम्बायोसिसतर्फे स्थापन करण्यात आलेल्या सिम्बायोसिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटचे (साई) उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याबाबत भाष्य केले. त्यात त्यांनी पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतीही माहिती दिली.

फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमी कंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंगमुळे येत्या काळात मोठे बदल घडणार आहेत. तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्यावर स्वार होणे आवश्यक असते. तंत्रज्ञानामुळे गती मिळणे, अचूक निर्णय घेणे, कार्यक्षमतेमध्ये वाढ होणे शक्य आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. मात्र, ‘एआय’मुळे अनेक आव्हानेही निर्माण होत आहेत. एआयद्वारे छायाचित्रे, आवाज तयार करून डिजिटल घोटाळे, फसवणूक असे प्रकारही घडतात. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा जबाबदार आणि सकारात्मक वापर गरजेचा आहे. अनुकुल विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी राज्य शासनाने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मुंबई, पुणे, नागपूर येथे तीन संस्थांची स्थापना केली आहे. या संस्था कायदा आणि सुव्यवस्था, कृषी, तंत्रज्ञान, प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतील. तसेच नागरिकांनाही प्रशिक्षिक करण्यात येणार आहे पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यासाठी ‘गुगल’सह करार केला आहे. यात रस्त्यांवरील सीसीटीव्हीच्या विदाचा वापर करून उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. त्यातून वाहतूक नियोजन करणे शक्य होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

एआय’ क्रांतीमध्ये आघाडी घेण्याची हीच योग्य वेळ

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जाणून घेत सध्या होत असलेल्या क्रांतीमध्ये आघाडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ‘एआय’मुळे नोकऱ्यांचे काय होणार, किती नोकऱ्या जाणार असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, आताच्या पिढीचा जन्म प्रगल्भ डॉट कॉम युगात झाला आहे. १९९०मध्ये डॉट कॉम सुरू झाल्यावरही असे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, भारताने त्या प्रश्नांची उत्तरे देत या क्षेत्राचे नेतृत्त्व केले. आता एआयची मोठी लाट आली आहे. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण होणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.