पुणे : वारजे भागातील रामनगर येथे विजेचा धक्का लागून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली असून, महावितरण कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अपघातग्रस्त मुलाच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत केली जाणार असून, त्यापैकी वीस हजार रुपये तातडीची मदत म्हणून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वारजे भागातील रामनगर परिसरात विजेचा धक्का लागून मयंक प्रदीप अडागळे या दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी घडली होती. या मुलाच्या घरासमोर असलेल्या लोखंडी विजेच्या खांबामध्ये वीज प्रवाहित झाल्याने हा मृत्यू झाला होता का, तसेच या प्रकारच्या घटना या भागात यापूर्वीही घडल्या होत्या का, अशी विचारणा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘महावितरण कंपनीच्या विद्युतभारित लोखंडी विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने मुलाचा धक्का बसून मृत्यू झाला. मात्र, अशा प्रकारच्या घटना यापूर्वी झालेल्या नाहीत. या अपघाताची चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला नोटीस बजाविण्यात आली आहे.’