‘धनगर समाजाकडे सरकार दुर्लक्ष करत असून शैक्षणिक व राजकीयदृष्टय़ा मागासलेल्या या समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करून त्यांना योग्य त्या सवलती मिळणे आवश्यक आहे,’ असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.
सुंबरान साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सुंबरान साहित्य संमेलना’चे देशमुख यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री आणि विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा डांगे, माजी आमदार पोपटराव गावडे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुकाराम पाटील या वेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘धनगर समाज उपेक्षित आणि विखुरलेला आहे. या समाजाला एकत्र आणण्यासाठी साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते. या समाजात पारंपरिक मेंढीपालनाऐवजी ऊसतोडणी करावी लागणाऱ्या कामगारांची संख्या वाढलेली आढळते. हे चित्र बदलायला हवे. धनगर समाजाला अनुसूचित जमातींसाठीच्या सवलती मिळाव्यात यासाठी शिफारस करणे आवश्यक आहे.’’
धनगर समाजातील लेखकांनी कथा कादंबऱ्यांपेक्षा धनगर समाजातील थोर पूर्वजांचा इतिहास शब्दबद्ध करणे आवश्यक असल्याचे डांगे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अहिल्याबाई होळकर यांचे समग्र चरित्र आजही मराठीत उपलब्ध नाही. देशाचा इतिहास धनगर समाजाने घडवला असून या इतिहासावर अतिक्रमणे झाली आहेत. आपल्या पूर्वजांच्या वारशाचे विडंबन न होऊ देता तो पुढे चालवणे आवश्यक आहे. २००५ सालापासून केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातींविषयीच्या अहवालात धनगर समाजाचा उल्लेख आहे. तरीही या समाजाला अनुसूचित जमातींसाठीच्या सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे.’’  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhangar samaj should be in scheduled tribe mla ganpatrao deshmukh
First published on: 15-07-2013 at 02:41 IST