पोटाला चिमटा घेऊन साहित्य प्रेमापोटी जमा केलेला वैयक्तिक ग्रंथसंग्रह समाजासाठी खुला करण्याच्या उद्देशातून ग्रंथालय उभारण्याचे प्रयत्न ढेरे कुटुंबीयांकडून सुरू आहेत. या संदर्भात ढेरे यांच्या कन्या डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षां गजेंद्रगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती.
ढेरे यांच्या संशोधनाची साधने आणि त्यांच्या पुस्तकांविषयी माहिती देणारे संकेतस्थळ यापूर्वीच विकसित करण्यात आले आहे. मात्र, कधी उपाशी राहून तर कधी अर्धपोटी राहून अण्णांनी पुस्तकांचा संग्रह केला आहे. या ग्रंथसंग्रहामध्ये इतिहास, संतसाहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा विविध विषयांवरील ४० हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.
मराठी संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या नव्या पिढीच्या संशोधकांसाठी ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे या विपुल ग्रंथसंपदेची व्यवस्था करण्याच्या उद्देशातून ग्रंथसंग्रहाला अधिकृत स्वरूप देत ट्रस्टची स्थापना करून हा संग्रह समाजासाठी खुला करण्याचा ढेरे कुटुंबीयांचा मानस आहे.
या ट्रस्टच्या स्थापनेबाबत डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षां गजेंद्रगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती. या नियोजित ट्रस्टच्या कल्पनेचे स्वागत करून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या ट्रस्टच्या स्थापनेचा औपचारिक कार्यक्रम लवकरच होणार आहे. मात्र, या ट्रस्टचे प्रेरणास्थान असलेले डॉ. रा. चिं. ढेरे आपल्यामध्ये नाहीत याची सल साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला जाणवल्याशिवाय राहणार नाही.
ग्रंथसंपदा खुली करण्याबाबत ४ महिन्यांपूर्वीच सूतोवाच
वैयक्तिक स्वरूपात ४० हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश असलेला विपुल गं्रथसंग्रह करणारे डॉ. रा. चिं. ढेरे यांना सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती मंडळातर्फे साहित्य सेवा सन्मान प्रदान करण्यात आला होता. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमामध्ये अण्णांच्यावतीने हा सन्मान अरुणा ढेरे यांनी स्वीकारला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना ढेरे यांनी अण्णांचा ग्रंथसंग्रह समाजासाठी खुला करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.