पुणे : जीवनशैलीतील योग्य बदलांमुळे प्री-डायबेटिस म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती नियंत्रणात येत असल्याचे पुण्यातील ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस संस्थे’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. संस्थेने ४२७ रुग्णांवर तीन वर्षे चाचण्या करून हा निष्कर्ष काढला आहे. या संशोधनामुळे मधुमेहपूर्व स्थितीतील रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ डायबेटिस रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
देशातील ८९ शहरांतील १८ ते ७५ वयोगटाचील ४२७ रुग्णांचा यात समावेश होता. हे सर्व रुग्ण मधुमेहपूर्व स्थितीतील होते. त्यांची तीन महिन्यांतील सरासरी रक्तशर्करा पातळी म्हणजेच एचबीए१सी ५.७ ते ६.४ टक्के होती आणि ते इन्शुलीन घेत नव्हते. या रुग्णांचा एक वर्षांचा ऑनलाइन जीवनशैली सुधार कार्यक्रम घेण्यात आला. यात वनस्पतीजन्य आहार, शारीरिक व्यायाम, मानसिक आधार आणि वैद्यकीय व्यवस्थापन यांचा समावेश होता. सुरुवातीला या रुग्णांच्या शरीराचा आकार, वजन यांचे मोजमाप करण्यात आले. याचबरोबर रुग्णाचे रक्त, लघवी अथवा पेशींमधील साखरेची पातळी तपासण्यात आली.
या रुग्णांचा वर्षभराचा जीवनशैली सुधार कार्यक्रम संपल्यानंतर ४७.१ टक्के रुग्ण हे मधुमेहपूर्व स्थितीतून बाहेर पडल्याचे निष्पन्न झाले. याचबरोबर त्यांचे वजनही कमी होऊन त्यांच्या एचबीए१सी पातळीत सुधारणा झाली होती. तसेच, त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी, बॉडी मास इंडेक्स आणि रक्तदाबामध्येही सुधारणा आढळून आली.
विशेष म्हणजे या रुग्णांपैकी ३४ टक्के रुग्णांचे सरासरी १० टक्के वजन कमी झाले. पुरुषांपेक्षा महिला रुग्णांचे वजन जास्त कमी झाल्याचे या अभ्यासातून समोर आले. या अभ्यासामध्ये डॉ. प्रमोद त्रिपाठी यांच्यासह डॉ. दीप्तीका तिवारी, डॉ.निधी कदम,डॉ.अनघा व्यवहारे, डॉ. बेबी शर्मा, डॉ. तेजस काथरीकोली, डॉ. मल्हार गानला व डॉ. बंशी साबू यांचा समावेश होता.
अर्ध्या रुग्णांमध्ये सुधारणा फ्रीडम फ्रॉम डायबेटिसचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी म्हणाले की, भारतात मधुमेहपूर्व स्थिती ही वाढती चिंता असून, त्याचे प्रमाण अंदाजे १५ टक्के आहे. आपल्या जीवनशैलीत सुधारणा करून त्यावर नियंत्रण मिळवता येते. या अभ्यासाचे उद्दिष्ट एकात्मिक जीवनशैलीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे हा होता. यात जवळपास अर्ध्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली. यावरूनच भारतीय लोकसंख्येमध्ये मधुमेहपूर्व व्यवस्थापन करण्यासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित होते.