कंपनी सेक्रेटरीच्या (सीएस) फाउंडेशन परीक्षेमध्ये पुण्यातील विद्यार्थिनींनी बाजी मारली असून नव्या पुण्यातील दीपिका पात्रा ही विद्यार्थिनी देशात पहिली आली आहे, तर अनिशा रहेजा ही विद्यार्थिनी तिसरी आली आहे.
द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेकडून सीएसची परीक्षा घेतली जाते. जून २०१३ मध्ये झालेल्या सीएस फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये देशभरामध्ये पुण्यातील दीपिका पात्रा ही विद्यार्थिनी पहिली आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर एर्नाकुलम येथील कविथा कुमार तर तिसऱ्या क्रमांकावर अनिशा रहेजा या विद्यार्थिनीसह बंगळुरू येथील सायमा हुडाकल आणि दिल्लीमधील विष्णू बात्रा या विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. जुन्या अभ्यासक्रमामध्ये मेंगलोरची किर्थाना सुज्जीर ही विद्यार्थिनी प्रथम आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईतील सुज्जल रवी, सुरत येथील निखिल सिंघवी यांनी स्थान मिळवली आहे. गझियाबाद येथील यशू सिंघल ही विद्यार्थिनी तिसरी आली आहे.
सीएस फाउंडेशनची पुढील परीक्षा २२ डिसेंबरला होणार असून त्यासाठी २५ सप्टेंबपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. याबाबत  www.icsi.edu या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.