दृष्टिदोषामुळे काम करण्यास अक्षम असल्याने डॉ. धनराज माने यांची उच्च शिक्षण संचालक पदावरून अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. माने यांच्याकडे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली असून, डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे उच्च शिक्षण संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डॉ. धनराज माने उच्च शिक्षण संचालक पदी काम करण्यास अक्षम असल्याबाबत कॉप्स संघटनेचे अमर एकाड यांनी मुंबईत उपोषण केले होते. त्यानंतर डॉ. माने यांची जे. जे. रुग्णालयामार्फत वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिला. त्यानंतर डॉ. माने यांना दृष्टिदोष असल्याचे जे. जे. रुग्णालयाकडून प्रमाणित करण्यात आले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

हेही वाचा: शिवसृष्टी उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाअंतर्गत प्राप्त संरक्षणानुसार डॉ. माने यांना सेवा संरक्षणासहित सर्व लाभ देण्यात येणार आहेत. त्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या कार्योत्तर मान्यतेच्या अधीन राहून डॉ. माने यांच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. डॉ. माने यांचा उच्च शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे कामकाज सोपवण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. डॉ. माने यांच्या अधिसंख्य पदावरील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या उच्च शिक्षण संचालक पदाची जबाबदारी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. देवळाणकर यांना संचालक पदी रुजू होण्याचा आदेशही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिला.