पुणे : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावरील प्राध्यापक (सीएचबी) नियुक्ती, मान्यता, मानधन देण्याची कार्यपद्धती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निश्चित केलेली असूनही त्याचे विद्यापीठांच्या स्तरावर पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत विद्यापीठांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रस्ताव निकाली काढण्याचे, सहसंचालकांनी सात दिवसांत वेतन देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत.

डॉ. देवळाणकर यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या सेवा उपलब्ध होऊन शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे पार पाडता यावे यासाठी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची प्रत्येक वर्षी नियुक्ती करण्यासंदर्भात १७ ऑक्टोबर २०२२च्या शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार उपलब्ध कार्यभार निश्चित करणे, संबंधित विभागीय सहसंचालक यांच्या स्तरावरून ना हरकत प्रमाणपत्र देणे, व्यवस्थापन स्तरावरील जाहिरात, निवड पद्धती, विद्यापीठ मान्यता याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठांच्या स्तरावर तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

मान्यतेअभावी संबंधित महाविद्यालयांकडून मानधन देण्याचे प्रस्ताव विभागीय सहसंचालक कार्यालयास सादर करता आलेले नाहीत, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील अध्यापकांना वेळेत मानधन दिले जात नसल्याबाबतच्या तक्रारी, निवेदने विविध संघटनांकडून दाखल झाल्या आहेत, असे डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्व अकृषि विद्यापीठांनी विद्यापीठाच्या स्तरावर प्रलंबित असलेले तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीस मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव दोन दिवसांत निकाली काढावेत. सर्व उच्च शिक्षण विभागीय सहसंचालकांनी विशेष शिबिराचे आयोजन करून संबंधित महाविद्यालयांकडून मानधन देण्याची देयके स्वीकारावीत. तसेच प्राप्त झालेल्या देयकांनुसार तासिका तत्त्वावरील नियुक्त अध्यापकांना मानधन देण्याची कार्यवाही सात दिवसांमध्ये पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.