पुणे : अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे दाम्पत्यामध्ये विसंवाद वाढत आहे, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद करता येणं हे निरोगी नात्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘नाती (गोती?) गोची!’ अंतर्गत संदेश कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ‘पुनश्च हनिमून’ ह्या नाटकावर आधारित गप्पांमध्ये डॉ. आगाशे बोलत होते. ‘डेव्हलपिंग अवेरनेस थ्रू आर्ट’ने  आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक डॉ. मोहन आगाशे यांच्यासह मनोविकार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे, नाटकातले कलाकार अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी सहभागी झाले.

संदेश कुलकर्णी यांनी नाटक लिहिण्याची प्रेरणा तसेच आजकालच्या जगण्यात असलेली ताणाची कारणं विषद केली. मी सध्या मानसोपचार घेत असून त्याचा फायदा झाला, असे अमृता सुभाष यांनी सांगितले. दाभोलकर म्हणाले, संवेदनशीलता असल्या खेरीज नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणं अवघड आहे. नातं वाढायचं असेल तर  एकमेकांचा आदर करणं हा त्याचा पाया असायला हवा. डॉ. साठे म्हणाल्या, आपल्या समाजात अजूनही लोकं मानसोपचार घेण्यासाठी पुढे येत नाहीत. पण, “कपल्स थेरपी’ घेऊन अनेक प्रश्न सुटू शकतात. मानसोपचार तज्ञ डॉ. संज्योत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.