लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यात पालकांचा निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. प्रवेशासाठी ९४ हजार ७०० जागा उपलब्ध असताना आतापर्यंत केवळ ४८ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे दिसून येत असून, प्रवेशासाठी सोमवार (८ मे) अंतिम मुदत आहे.
राज्यात प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ८ हजार ८२३ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या. या जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४१३ बालकांच्या पालकांनी अर्ज केले. प्रवेशासाठीच्या सोडतीनंतर ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर निवड यादीतील मुलांच्या पालकांनी १३ एप्रिलपासून पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आरटीईच्या संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. मात्र त्यानंतर संकेतस्थळ सुरळीत सुरू झाले.
आणखी वाचा-केंद्रीय विद्यापीठांतील भरती प्रक्रिया ‘सीयू-चयन’ संकेतस्थळामार्फत
सुरुवातीला प्रवेश निश्चित करण्यासाठी २५ एप्रिलची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत प्रवेश न झाल्याने मुदतवाढीचा निर्णय घेऊन ८ मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली. मात्र प्रवेशाची मुदत संपण्यास एक दिवस बाकी असतानाची जेमतेम निम्मेच प्रवेश झाल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.