लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ३.८२ लाख माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १२.३१ लाख जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

ही योजना सन २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. योजना राबविण्यासाठी केंद्राचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के आर्थिक सहभाग आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान सहा गावे निवडण्यात येतात आणि प्रत्येक गावातून किमान ९० मृद नमुने काढून त्याच्या जमीन आरोग्यपत्रिका शेतकऱ्यांना देण्यात येतात. या जमीन आरोग्यपत्रिकेच्या आधारे कमतरता असलेल्या सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खतांच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येते. जमीन आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता स्थिती आणि त्यानुसार पिकांना द्यायच्या खत मात्रेची माहिती प्रात्यक्षिक, प्रशिक्षणातून दिली जाते.

आणखी वाचा-खराडी बाह्यवळण मार्ग परिसरातून मोटार चोरणारा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिल्ह्यात सन २०१५-१६ ते २०१६-१७ मध्ये १८१३ गावांमधील एक लाख ७१ हजार ८०२ मृद नमूने तपासून चार लाख ६१ हजार ५३६ जणांना आरोग्यपत्रिका देण्यात आली. सन १७-१८ ते १८-१९ या वर्षात १८०८ गावांमधील एक लाख ९१ हजार ३९० नमुने तपासून सात लाख ५३ हजार ८० पत्रिका देण्यात आल्या. सन २०१९-२० मध्ये १३ गावांतील ११ हजार ९४२ नमुने तपासून तेवढ्याच पत्रिकांचे वाटप करण्यात आले. सन २०२१-२२ मध्ये ३६ गावांतील ३६२० नमुने तपासून तेवढ्याच पत्रिका देण्यात आल्या, तर सन २०२२-२३ मध्ये आतापर्यंत २९८ गावांमधील ४१९० नमुने तपासून ४१९० पत्रिकांचे वाटप करण्यात आले, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.