आसमंत उजळवून टाकणारा आकाशकंदील आणि इवल्याशा प्रकाशाने परिसर प्रज्वलित करणारी पणती अशा झगमगत्या दीपोत्सवाचा रविवारी गोवत्सपूजनाने प्रारंभ झाला. पारंपरिक पेहरावातील सुवासिनींनी विद्युत रोषणाईने सजलेल्या मंडपामध्ये असलेल्या गाय-वासरूचे औक्षण करून पूजन केले. निनाद संस्थेतर्फे वसुबारसनिमित्त बहुविकलांग पाल्यांचे संगोपन करणाऱ्या मातांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका हद्दीतील गोठे शहराच्या जुन्या हद्दीबाहेर गेल्यामुळे वसुबारस सणाला गाय आणि वासरू यांना शहराच्या विविध भागांत पूजन करण्यासाठी आणले जाते. भांडारकर रस्त्यावरील साने डेअरी येथे वसुबारस सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेल्या मंडपामध्ये गाय आणि वासरू ठेवण्यात आले होते. पारंपरिक पेहराव आणि अलंकार परिधान केलेल्या सुवासिनींनी गाईसमवेत वासराची पूजा केली.

निनाद पुणे संस्थेतर्फे बहुविकलांग पाल्यांचे संगोपन करणाऱ्या मातांचा सन्मान करून वसुबारस सणाला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली. निवांत अंध विद्यालयाच्या मीरा बडवे यांच्या हस्ते अनिता वांजळे, समसूननेसा चौधरी, मेधा परदेशी, शोभा धरपळे, श्वेता  हिरेमठ, तबस्सुम कवटे, नितू शर्मा, रामजीतकौर सुखवीर सिंग, अनिता शिंदे, संगीता ढेणे, क्षमा उभे, संध्या पिसे, रेखा धिरे, राजश्री ओंकार, उज्ज्वला बर्वे आणि श्रेया पारखी यांचा सत्कार करण्यात आला. शुभदा जोशी, वनिता पिंगळे, शोभा शिंद, कल्याणी सराफ, सुनीता शिवणगे, सुनीती देशपांडे या वेळी उपस्थित होत्या.

सामाजिक उपक्रमांतून वंचितांना दिवाळीचा आनंद

वंचित घटकातील मुलांचा दिवाळीचा आनंद विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनातून द्विगुणित करण्यात आला. लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे एकलव्य न्यास संस्थेतील चिमुकल्यांना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.  वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, बालकलाकार वैष्णवी काळे, मिहिर सोनी, ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, चंद्रशेखर हलवाई, युवराज गाडवे, शिल्पकार विवेक खटावकर, डॉ.मिलिंद भोई, नितीन पंडित, कुमार रेणुसे, अ‍ॅड.शिरीष शिंदे या वेळी उपस्थित होते. नूतन बाल शिक्षण संघ संचालित आदर्श बाल मंदिर येथील पन्नासहून अधिक मुलांना रमा क्रिएशन्स व ३८८नारायण पेठ  वॉट्सअप ग्रुपतर्फे फराळ, नवीन कपडे व  शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अपेक्षा भालेराव, अमृता कानविंदे, रमा कानविंदे, माधुरी चव्हाण, शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. महा एनजीओ फेडरेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ‘नाते समाजाशी दान उत्सव २०१८’अभियानांतर्गत यवतमाळ येथील रसिकाश्रय संस्कृती कला व बहुद्देशीय संस्था (घाटंजी), प्रार्थना फाउंडेशन, स्नेहवन (भोसरी), ज्ञानशक्ती विकास वाहिनी (मंचर), जीवनदान अपंग सामाजिक शिक्षण संस्था (खंडाळा), अ‍ॅबनॉर्मल होम (पुणे) या संस्थांना आर्थिक व वस्तू स्वरुपातील मदत देण्यात आली. आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, मोहन जोशी, श्वेता शालिनी, प्रशांत जगताप, संदीप खर्डेकर, फेडरेशनचे शेखर मुंदडा, विजय वरुडकर या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali celebration in pune
First published on: 05-11-2018 at 02:28 IST