महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार ६९३ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ५७.१८ टक्के लागला.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. डी.एल.एड. परीक्षा २३ ते ३१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण ६ हजार ४५९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ६ हजार ३४१ उमेदवारांपैकाी ३ हजार ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमातून सर्वाधिक ४ हजार ६४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या ४ हजार ५५८ उमेदवारांपैकी २ हजार ५५९ उमेदवार उत्तीर्ण झाले. माध्यमनिहाय निकालात मराठी माध्यमाचा निकाल ५५.०७ टक्के, उर्दूचा ६४.१४ टक्के, हिंदीचा ६२.७१ टक्के, इंग्रजीचा ६०.१६ टक्के आणि कन्नडचा ९३.७५ टक्के निकाल लागला.
उमेदवारांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत दिले जाईल. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ ऑगस्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.