पुणे : पश्चिम घाटातील अतिशय दुर्मीळ, असुरक्षित प्रजाती असलेल्या मलबार काटेरी झाड उंदराचे (प्लॅटाकॅन्थोमिस लॅसियुरस) पहिल्यांदा डीएनए बारकोड तयार करण्यात आले आहेत. भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या (झेडएसआय) शास्त्रज्ञांच्या गटाने या बाबतचे संशोधन केले असून, यामुळे सखोल अभ्यास करून या प्रजातीची उच्च पातळीची वर्गीकरण स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, या प्रजातीसाठी अधिवास संरक्षणाचीही गरज व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या शास्त्रज्ञांच्या गटामध्ये पश्चिम प्रादेशिकमधील डॉ. श्यामकांत तलमले, डॉ. के. पी. दिनेश, श्रीमती शबनम अन्सारी, डॉ. जाफर पालोट, दक्षिण प्रादेशिक केंद्रातील डॉ. के. ए. सुब्रमण्यन यांचा सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ ॲनिमल डायव्हर्सिटी’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. दक्षिण पश्चिम घाटातील लहान सस्तन प्राण्यांच्या सर्वेक्षणादरम्यान सर्वेक्षण पथकाला केरळमधील सूर्यमुडीजवळ मलबार काटेरी झाडउंदीर आढळला. त्याच्या आण्विक (मॉलेक्युलर) अभ्यासानंतर नमुना पुढील अभ्यासासाठी भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या पुण्यातील पश्चिम प्रादेशिक केंद्रातील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात जमा करण्यात आला आहे.
पश्चिम घाटातील मलबार काटेरी झाड उंदरांसाठी अधिवासाचा ऱ्हास हा मुख्य धोका आहे. ही प्रजाती ५० मीटर ते २२७० मीटर उंचीवर आढळते. तसेच ती आययूसीएनच्या लाल यादीत समाविष्ट आहे. वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, २०२२ च्या अनुसूची दोननुसार या प्रजातीसाठी अधिवास संवर्धनाची गरज आहे, असे डॉ. श्यामकांत तलमले यांनी सांगितले.
या अभ्यासातून दक्षिण पश्चिम घाटातील जीवजंतूंच्या प्राचीन वंशाचे अस्तित्व, तसेच गोंडवाना खंडाच्या विघटनाच्या वेळी उष्णकटिबंधीय आश्रयस्थान म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट होत असल्याकडे डॉ. के. ए. सुब्रमण्यन यांनी लक्ष वेधले. मलबाल काटेरी झाड उंदरासारख्या प्रजातींसाठी डीएनए बारकोडिंग आणि फायलोजेनेटिक्ससारखी आण्विक साधने महत्त्वाची आहेत. त्यातून उत्क्रांतीचा इतिहास स्पष्ट होतो. तसेच पश्चिम घाटासारख्या जैवविविधतेच्या ‘हॉटस्पॉट्स’मध्ये अचूक वर्गीकरण आणि संवर्धनास मदत होते, असे डॉ. के. पी. दिनेश यांनी नमूद केले.
झपाट्याने होणाऱ्या हवामान बदलांच्या काळात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या, गूढ प्रजातींवर संशोधन महत्त्वाचे आहे. संवर्धन धोरण, प्रजातीचे दीर्घकालीन अस्तित्त्व राखण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन आवश्यक आहे.- डॉ. धृती बॅनर्जी, संचालिका, भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग