अत्यंत दुर्मिळ ‘गिल्बर्ट’ विकाराने ग्रासल्यामुळे रक्ताच्या उलट्यांनी हैराण झालेल्या तरुणीला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल २४ तास दिलेली अथक झुंज यशस्वी ठरली आहे. सदर तरुणी अवघ्या २३ वर्षांची आहे. तिच्या यकृताच्या कार्यात गंभीर बिघाड (लिव्हर डिकाँपनसेशन) झाल्यामुळे तिची तरुणीची प्रकृती चिंताजनक होती.

रुबी हॉल क्लिनिकमधील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे या तरुणीला वाचवणे शक्य झाले आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. साठे म्हणाल्या, या तरुणीला पहाटे रुग्णालयात आणले त्यावेळी तिला सातत्याने रक्ताच्या उलट्या होत होत्या. तिचे हिमोग्लोबीन २.८ पर्यंत खाली आले होते. नाडीचे ठोके मंदावले होते. वैद्यकीय परिभाषेत याला हेमॅटोमेसिस म्हणतात.

शरीरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त बाहेर पडताना मोठ्या प्रमाणावर रक्त संक्रमणाची क्रिया वेगाने करण्याची गरज भासते. सुदैवाने आमच्याकडे सुसज्ज रक्तपेढी असल्याने आम्हाला ते करणे शक्य झाले. रक्तदाब, हिमोग्लोबिन स्थिरस्थावर करुन तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले. रक्ताच्या उलट्यांचे निदान करण्यासाठी केलेल्या तपासण्यांमधुन तिच्या अन्ननलिकेतील भिंतींवरच्या रक्तवाहिन्या फुगल्याचे दिसून आले. यकृताशी संबंधित रक्तवाहिन्यांवरील रक्तदाब वाढल्याने हे होत असल्याचे स्पष्ट झाले. हा रक्तस्त्राव थांबवण्याचे मोठे आव्हान होते.

रूबी हॉल क्लिनिकचे रक्तविकार तज्ज्ञ डॉ. विजय रमणन म्हणाले, ‘यकृत रक्तवाहिन्यांचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी या रक्तवाहिन्या पोटातील रक्तवाहिन्यांशी एका स्टेंटच्या मदतीने जोडल्या जातात. ही प्रक्रिया कमीत कमी छेद वापरून केली जाते. या प्रक्रियेला ट्रान्सजुगुलर इंट्रा हेपॅटिक पोरटोसिस्टेमिक शंट (टीआयपीएस) म्हणतात. त्यामुळे यकृताशी निगडीत रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होऊन रक्तस्त्राव थांबवविण्यास मदत झाली. ही प्रक्रिया अत्यंत जोखमीची होती, मात्र तरुणीचा जीव वाचवण्यासाठी ते करणे आवश्यक होते.

सदर तरुणीची प्रकृती आता सुधारली असून रक्तदाबही स्थिरावला आहे. मूत्रपिंडाचे कार्य सुधारले आहे. त्यामुळे रुग्ण तरुणीला अतिदक्षता विभागाच्या बाहेर आणल्याचे रुबी हॉल क्लिनिककडून सांगण्यात आले आहे. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संघात डॉ. प्राची साठे, डॉ. सन्मय चौधरी, डॉ. तनिमा बरोनिया, डॉ. स्नेहल मुजुमदार, डॉ. विजय रमणन, डॉ. यादव मुंडे, डॉ. नितीन पै, डॉ. साहील रासने यांचा समावेश होता.