पुणे :रेडीरेकनरच्या (जमिनीचे चालू बाजारमूल्य) जुन्या दराने आगाऊ मुद्रांक शुल्क भरलेल्या मात्र दस्त नोंदणी न केलेल्या नागरिकांना येत्या ३१ जुलैपर्यंत जुन्या दराने दस्त नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार या प्रक्रियेसाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधीत शिल्लक राहिला आहे.
रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून राज्यातील हजारो नागरिकांनी चालू वर्षी ३१ मार्च पूर्वी आगाऊ मुद्रांक शुल्क भरले होते. त्यानुसार संबंधित नागरिकांना चार महिन्यांत दस्त नोंदणीची सवलत देण्यात आली होती. मुद्रांक शुल्क भरलेल्या दिवसापासून पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदविण्याची सुविधा त्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार आगाऊ मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना ३१ जुलैपर्यंत दस्त नोंद करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जुन्या दराने दस्त नोंदणी करण्यासाठी केवळ नऊ दिवस राहिल्याची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) चालू आर्थिक वर्षासाठी वाढ केली आहे. पुणे महापालिका क्षेत्रात ४.१६ टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून या नव्या दराची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
करोना संकटामुळे सन २०२० रेडिरेकनरचे दर जाहीर करण्यात आले नव्हते. त्यापूर्वी दोन वर्षे रेडिरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने सप्टेंबर २०२० मध्ये काही प्रमाणात दरात वाढ करण्यात आली. सन २०२१ मध्ये दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. त्यानंतर २०२२ -२३ मध्ये रेडिरेकनरच्या दरात सरासरी ९.२ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडिरेकनदर दरामध्ये वाढ झाली नव्हती.