लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: वाहतुकीची वर्दळ आणि माणसांची गर्दी असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लॅम्बोर्गिनी मोटारीने एका भटक्या श्वानाला धडक दिली. या धडकेने श्वानाचा मृत्यू झाला. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकात सोमवारी (७ ऑगस्ट) हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कार चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नीना नरेश राय (वय ५७) या महिलेने तक्रार दिली आहे.
आणखी वाचा-संभाजी भिंडेंविरुद्ध तुषार गांधींकडून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राय या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका भरधाव लेम्बोर्गिनी मोटारीने गोखले चौकात असलेल्या एका श्वानाला जोरदार धडक दिली. त्यानंतर तो मोटारचालक तसाच सुसाट निघून गेला. पण, या धडकेत श्वानाचा मृत्यू झाला. घटनेनंतर राय यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पण, सुरूवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप राय यांनी केला.