निर्बीजीकरण तुटपुंजे; कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटी
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही केल्या कमी होताना दिसत नाही. पालिकेच्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून मार्चपर्यंतच्या तीन महिन्यात ५,३१३ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याचा प्रसाद मिळाला आहे. शहराच्या विस्ताराबरोबरच रस्त्यांवर वाढलेले अन्नपदार्थाचे स्टॉल, तयार होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटी आणि कुत्र्यांचे तुटपुंजे निर्बीजीकरण हे मुद्दे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहेत.
गेल्या वर्षभरात शहरात तब्बल १८,५६७ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याचा त्रास सहन करावा लागला आहे. चालू वर्षी जानेवारीत १,७२८, फेब्रुवारीत १,९१७ नागरिकांना, तर मार्चमध्ये १,६६८ नागरिकांना कुत्री चावली आहेत.
भटक्या कुत्र्यांची निश्चित संख्या ज्ञात नसली तरी पुण्याच्या रस्त्यांवर ५० हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज सांगितला जातो. त्या तुलनेत कुत्र्यांच्या होणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या खूपच कमी असल्याचे मत प्राणिप्रेमी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षभरात ११ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. ‘कॅनाईन कंट्रोल अँड केअर’ संस्थेच्या विश्वस्त धनश्री भिसे म्हणाल्या,की कुत्री प्रामुख्याने कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरच जगत असल्यामुळे या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कुत्री जेव्हा माजावर येतात त्या कालावधीत ठरावीक भागातील ८० टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणे गरजेचे असते. निर्बीजीकरणाची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. परंतु ते तितकेसे सोपेदेखील नाही.
पालिकेच्या भटकी कुत्री नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. अमित शहा म्हणाले, ‘‘कुत्र्यांना प्रत्यक्ष पकडणे अवघड असून त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम चार क्षेत्रीय कार्यालयांकडून केले जाते. निर्बीजीकरण व जखमी कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी बाणेरला एक ‘डॉग पाँड’ सुरू करण्याचा प्रस्ताव असून आणखी एका ‘डॉग पाँड’साठी जागेचा शोध सुरू आहे.’’

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची तक्रार येथे करा
* वारजे, औंध, कर्वेनगर, घोले रस्ता ९६८९९३१९३६
* टिळक रस्ता, विश्रामबागवाडा, कसबा, भवानी, सहकारनगर ९६८९९३१५३१
* कोरेगावपार्क, विमाननगर, येरवडा, संगमवाडी, ढोलेपाटील रस्ता ९६८९९३१७२६
* हडपसर, कोंढवा-वानवडी, धनकवडी, बिबवेवाडी ९६८९९३१०८४