‘दृष्टिहीन मुलांच्या पालकांच्या बाबतीत जर्मनी आणि भारत या दोन्ही ठिकाणी मी प्रकर्षांने अनुभवलेली गोष्ट म्हणजे मुलांना अतिसुरक्षित वातावरणात ठेवणे. पालकांचे मुलांवर खूप प्रेम असते; पण पाल्यावर प्रेम करणे आणि त्याच्या जीवनाची सूत्रेच आपल्या हातात घेणे, यातला फरक ते विसरतात. पाल्यावरचे प्रेम त्याच्यावर विश्वास दाखवण्यात परावर्तित झाले पाहिजे. जेणे करून ते मूल स्वत:साठी योग्य तो रस्ता स्वत: शोधेल,’ असे मत तिबेटी भाषेसाठी ब्रेल लिपी विकसित करणाऱ्या सॅब्रिया टेनबर्कन हिने व्यक्त केले.
सॅब्रिया स्वत: दृष्टिहीन असून तिला २००५ मध्ये शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. तिने आपला डच जोडीदार पॉल क्रोनेनबर्ग याच्याबरोबर दृष्टिहीनांसाठी ‘ब्रेल विदाउट बॉर्डर्स’ या संस्थेची स्थापना केली असून दृष्टिहीनांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारा ‘कांथारी’ हा प्रकल्पही त्यांनी केरळमध्ये सुरू केला आहे. किशोर व वृंदा फडके यांच्यातर्फे रविवारी सॅब्रिया आणि पॉल यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ती बोलत होती.
सॅब्रिया म्हणाली, ‘‘लहानपणी एका आनुवंशिक आजारामुळे मला अंधत्व आले. असे होणार याची कल्पना माझ्या पालकांना होती. पण त्यांनी त्या गोष्टीसाठी मला तयार केले. अंधत्व येण्यापूर्वी मला अधिकाधिक जग कसे पाहता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दृष्टिहीन म्हणून वेगळे पाडले जाणे मी देखील सुरुवातीला अनुभवले. तुम्ही दृष्टिहीन असाल आणि तुमच्याकडे संवाद साधण्याची कला नसेल, तर तुम्ही इतरांसाठी अदृश्यच असल्यासारखे असता. त्यामुळे इतरांचे ऐकण्याची आणि आत्मविश्वासाने संवाद करण्याची कला मी प्रयत्नपूर्वक आत्मसात केली. अंधत्व म्हणजे अंधार ही व्याख्या चुकीची आहे. विविध अवयवांनी मनुष्य जे अनुभव घेत असतो त्याची दृष्टिहीन नसलेल्यांपेक्षाही चांगली कल्पना दृष्टिहीन व्यक्ती करू शकतात. त्यामुळेच ही मंडळी अधिक चांगली स्वप्ने बघू शकतात. भारतात खूप कमी दृष्टिहीन व्यक्ती चालताना पांढरी काठी वापरतात. बाहेर फिरताना अनेकांचे नातेवाईक त्यांना घेऊन जात असतात. हे चुकीचे आहे. पांढरी काठी दृष्टिहीनांचे इतरांवरील अवलंबित्व संपवते.’’
विशिष्ट ध्येयाने एकत्रितपणे काम करताना आलेले अनुभव पॉलने सांगितले. तो म्हणाला, ‘‘मी कधी सॅब्रियाकडे कधी अंध म्हणून पाहिले नाही. अनेकदा तिला दिसत नाही हे मी चक्क विसरतो. दिसत नसलेल्यांनाही इतरांसारखेच वागवायला हवे. त्यांच्याशी बोलताना उगाच दयेचा सूर नको.’’