काम बंद असल्याने कळा सोसाव्या लागणाऱ्या कलाकारांचे आंदोलन

पुणे : ‘आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका,’ अशी मागणी करीत काम बंद असल्याने कळा सोसाव्या लागणाऱ्या कलाकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कविता आणि लोकगीताच्या सादरीकरणातून कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या.

रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात चित्रपट, मालिका, नाटकातील पडद्यामागील कलाकार, लोककलाकार, जादूगार, ऑर्के स्ट्रा, नृत्य क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग घेतला.

रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रचे शिवा बागुल, बाळासाहेब बांगर, प्रशांत बोगम, प्रवीण घरडे, कुमार पाटोळे या वेळी उपस्थित होते. ‘करोनामुळे काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. पण, तरीही सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता सांगा आम्ही जगायचे कसे? असा सवाल कलाकारांनी उपस्थित केला. विविध मागण्यांचे फलक हाती घेत घोषणाही दिल्या.

नाटय़गृहे सुरू करून कला सादरीकरणाची आणि चित्रीकरणाची परवानगी मिळावी, कलाकारांची सरकार दरबारी नोंद करावी, कलाकारांना रोजगार हमी योजना लागू करून आर्थिक मदत करावी, अशा मागण्यांचे निवेदन  जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले.

करोना निर्बधांच्या पार्श्वभूमीवर काम बंद असल्याने कळा सोसाव्या लागणाऱ्या कलाकारांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.