आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेबाबत काँग्रेस-राष्ट्रावादीत तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने नाराज असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, २३ एप्रिलला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आज ४ सप्टेंबर उजाडला आहे. या चार महिन्यांच्या काळात आघाडीच्या बैठका झाल्या मात्र, इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्याबाबत अद्याप राष्ट्रवादीचा एकही वरिष्ठ नेता काहीही बोलला नाही. तसेच इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा प्रस्तावित नसताना अचानक इथे यात्रा कशी आली? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच प्रामाणिकपणे काम करुनही राष्ट्रवादीकडून कायमच अन्यायी वागणूक देण्यात आली असे सांगत आमच्या सभ्यपणाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आघाडीच्या बैठकीत जुन्नरच्या जागेचा प्रश्न सुटला मात्र, इंदापूरच्या जागेचा का नाही सुटला? असा सवाल करताना आता लबाड आणि फसवणूक करणाऱ्या लोकांसाठी काम करायचं नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. लोकसभेसाठी मला भाजपाची ऑफर होती पण आघाडी असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. मात्र, आता राज्यात आणि देशात काय चाललंय हे वेगळं सांगायला नको, अशा शब्दांत त्यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेला हवा दिली. मात्र, कोणतीही घोषणा केली नाही.

राष्ट्रवादीवर टीका करताना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मात्र तोंडभरुन कौतुक केले. गेल्या पाच वर्षात आपण सत्तेत आणि कुठल्याही पदावर नसताना विधानभवनात किंवा मंत्रालयात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुठल्याही कामासाठी नकार दिला नाही. माझ्या पुस्तक प्रकाशनावेळी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीच्या वेळेत बदल केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.