पुणे : चेन्नई येथील ‘स्विच’ कंपनीकडून मागविण्यात आलेली ‘डबलडेकर’ बसची सोमवारपासून (१५ सप्टेंबर) हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा ‘आयटी हब’कडे जाणाऱ्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात येणार आहे. ‘बृहनमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्ट’च्या (बेस्ट) धर्तीवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरातील सार्वजनिक वाहूतक व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून पुढील आठवडाभर डबलडेकर बसची चाचणी घेतली जाणार आहे.

पीएमपी प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून डबलडेकर बस सुरू करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. याबाबत प्रस्तावही तयार करण्यात आले. मात्र, अंमलबजावणी झाली नाही. आता वाहतूक कोंडीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपीने आयटी क्षेत्रात डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत चेन्नईतील स्विच कंपनीसोबत बैठक घेऊन चाचणी घेण्यासाठी पथकाला निमंत्रण देण्यात आले आहे.

हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या परिसरात ‘डबलडेकर’ बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीदरम्यान ‘आयटी हब’कडे जाणारे रस्ते, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा कालावधी, बसची क्षमता याबाबत पाहणी केली जाणार आहे. या आधारे डबलडेकर बस शहरातील प्रमुख रस्त्यांवरून आयटी क्षेत्रांपर्यंत चालवली जाणार आहे. यावेळी कंपनीचे आणि पीएमपीचे शिष्टमंडळ सोबत असणार आहे.

‘सोमवारपासून (१५ सप्टेंबर) पुढील आठवडाभर विविध रस्त्यांवरून या डबलडेकर बसची चाचणी घेण्यात येणार आहे. अभ्यासातील निष्कर्षानुसार वेगवेगळ्या तपासण्या करून मार्गांची आखणी केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल,’ अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिली.

डबलडेकर बसचा आढावा

बसची किंमत : दोन कोटी रुपये

आसन संख्या : ७०

प्रामुख्याने शहरातील आयटी क्षेत्रांच्या परिसरात डबलडेकर बसची चाचणी घेण्यात येणार आहे. ही बस इलेक्ट्रीक असल्याने वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता येणार असून दुरुस्तीचा खर्चही कमी लागणार आहे. शहरातील मेट्रोचे पादचारी पूल, मार्गिकांचे अडथळे निर्माण होतात किंवा नाही, तसेच इतर कोणत्या समस्या येत आहेत, याचा चाचणीदरम्यान अभ्यास करण्यात येणार आहे. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल