निस्पृह बाण्याचे अधिकारी असा लौकिक असलेले माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले (वय ८५) यांचे हृदयविकाराचा झटक्याने सोमवारी राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी सुजाता, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य स. वा. कोगेकर यांचे गोडबोले हे जावाई होत.
रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात गोडबोले केंद्रीय गृहसचिव होते. राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी बाबरी मशिदीचे जतन करणे आवश्यक आहे अशो त्यांची धारणा होती. यासंदर्भात गोडबोले यांनी वारंवार तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र, बाबरी मशिदीचे पतन रोखता आले नाही यामुळे व्यथित होऊन गोडबोले यांनी गृहसचिव पदाचा राजीनामा दिला होता.
आज एका चांगल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्रच नव्हे तर देश मूकला – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माधव गोडबोले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. “माधव गोडबोले हे महाराष्ट्राचे अत्यंत कतृत्वान असे अधिकारी होते. त्यांचा खरा परिचय लोकांना झाला, यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना, परराष्ट्रमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून यांनी काम केलं होतं. यशवंतराव चव्हाणांच्या देशभरातील दौऱ्यात ते नेहमीच त्यांच्यासोबत असायचे. महाराष्ट्राच्या मंत्रालयात त्यांनी अनेक वर्षे काम केलं. माझ्यासोबतही काम केलं, ते अर्थ विभागाचे सचिव होते. एक स्वच्छ, अत्यंत स्पष्ट. वेळप्रसंगी आम्हा लोकांच्या मतावर देखील आपली भूमिका परखडपणाने मांडायला न कचरणारे, असे एक अधिकारी म्हणून त्यांचा परिचय होता. देशाच्या गृह खात्याची जबाबदारी त्यांनी सचिव म्हणून सांभाळली होती. अत्यंत कठीण परिस्थीतून देखील मार्ग काढण्यासाठी त्यांनी अतिकष्ट घेतले होते. आज एका चांगल्या अधिकाऱ्याला महाराष्ट्रच नव्हे तर देश मूकला आहे.” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रानं कर्तृत्ववान सुपुत्र गमावला – अजित पवार
तर, “माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले साहेबांच्या निधनानं महाराष्ट्रानं कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. सामाजिक, आर्थिक प्रश्नांचा सखोल अभ्यास असलेलं, राजकीय नेतृत्वाला अचूक, स्पष्ट सल्ला देणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. स्वर्गीय यशवंतराच चव्हाण साहेब संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री असताना त्यांचे सचिव तसंच शरद पवारांसोबतही डॉ. गोडबोले यांनी काम केलं होतं. राज्य व केंद्राच्या सेवेत प्रदीर्घ सेवा करतांना अनेक महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. कर्तव्यदक्ष अधिकारी, सिद्धहस्त लेखक, संवेदनशील व्यक्तिमत्वं म्हणून डॉ. माधव गोडबोले हे कायम स्मरणात राहतील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.