पुणे : ज्येष्ठ लेखिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘मसाप स्नेहबंध’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रा. राजा दीक्षित यांनी दिलेल्या देणगीतून साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार देण्यात येतो, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या २७ मे रोजी होणाऱ्या १२० व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.