पुणे : ‘डॉ. जयंत नारळीकर हे अत्यंत सकारात्मक स्वभावाचे होते. त्यांचे काम अव्याहत सुरू होते. काही दिवसांपूर्वी कंबरेची शस्त्रक्रिया करायची असतानाही त्यांनी त्यांच्या कन्येला पी. जी. वूडहाऊसचे पुस्तक आणायला सांगितले होते. आता त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही. गेली २९ वर्षे त्यांच्याबरोबर असण्याची सवय झाली आहे,’ अशा भावपूर्ण शब्दांत डॉ. नारळीकर यांचे सहायक वेंकटेश सामक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सामक म्हणाले, ‘डॉ. नारळीकर सरांच्या भेटी, लेख, पुस्तके, पत्रव्यवहार यांची जबाबदारी मी पाहत होतो. मी केवळ २२ वर्षांचा असताना सरांबरोबर काम करू लागलो. मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे दडपण आले होते. मात्र, सरांनी मला खूप सांभाळून घेतले. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ही भाग्याची गोष्ट आहे. सरांना वेगळा वेळ काढून विज्ञानकथा लेखन करावे लागले नाही. त्यांनी बऱ्याचदा विमानतळावर बसून त्यांचे लेखन केले. सरांना खूप पत्रे यायची. त्यांना ते आवर्जून उत्तरे द्यायचे. निधनाच्या आदल्या दिवशी आम्ही एकत्र होतो. त्यांची काही कामे होती. त्याबाबत पाऊण तास आमचे बोलणे झाले. असे काही होईल, असे वाटले नव्हते. मंगलाताई यांचे निधन झाल्यावर दोन वर्षे सरांसाठी अवघड होती. त्यातही ते कधी थांबले नाहीत. २००३ पर्यंत ते ‘आयुका’त संचालक म्हणून कार्यरत होते. ते निवृत्त झाल्यावरही त्यांच्याबरोबर काम करत होतो.
इलेक्ट्रॉनिक अभियंता असलेले एन. आर. जोशी यांना खगोलशास्त्रामध्ये रस आहे. ते म्हणाले, ‘मला खगोलशास्त्रात रस असल्याने ‘आयुका’च्या ग्रंथालयातील संदर्भग्रंथ वापरण्याची परवानगी हवी होती. त्याबाबत डॉ. नारळीकर यांना भेटल्यावर त्यांनी माझ्या कामाची माहिती घेऊन १९९१ ते २००१ अशी १० वर्षे मला ‘आयुका’चे ग्रंथालय वापरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक पुस्तके, ग्रंथांचे वाचन करता आले. त्यानंतर डॉ. नारळीकर यांची दोन-तीन वेळा भेट झाली. अत्यंत आदरणीय, मोठे व्यक्तिमत्त्व होते.’
कलासक्त शास्त्रज्ञ
‘डॉ. जयंत नारळीकर हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, ते अतिशय उत्तम रसिक होते. त्यांना विविध कला-कलाकारांविषयी महत्त्व होते. त्याचा भरपूर अनुभव ललित कला केंद्रात विभागप्रमुख म्हणून काम करताना आला. योगायोगाची गोष्ट म्हणजे, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील गोळे बंगल्यात ‘आयुका’ची स्थापना झाली. संकुलाचे बांधकाम झाल्यावर ‘आयुका’ तिकडे स्थलांतरित झाले आणि तो बंगला ललित कला केंद्रासाठी देण्यात आला. त्याच जागेत आजही ललित कला केंद्राचा कारभार चालतो. मात्र, १९९६मध्ये ललित कला केंद्राकडे पायाभूत सुविधा नव्हत्या. एकदा केंद्रात मैफल असताना डॉ. नारळीकर दाम्पत्य आले. त्यावेळी त्यांनी काही मदत लागली तर सांगा, असे सांगितले. त्यानंतर ललित कला केंद्रात आलेले गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इब्राहिम अल्काझी यांच्यासारखे मोठे कलाकार ‘आयुका’च्या अतिथीगृहात राहिले.
डॉ. नारळीकर यांनी आमच्या कार्यक्रमांसाठी ‘आयुका’चे सभागृह, ‘आयुका’चा परिसर खुला करून दिला. ‘आयुका’च्या सभागृहाबाहेर विनोद लव्हेकर याने नाटकाचा प्रयोग केला होता. भक्ती बर्वे या आमच्याकडे शिकवायला यायच्या, तेव्हा डॉ. नारळीकरही आवर्जून यायचे. बिखरे बिंब या नाटकाचा प्रयोग ‘आयुका’च्या सभागृहात केला होता. कलेच्या एका नव्या विभागाला विद्यापीठाशी थेट संबंधित नसलेल्या दुसऱ्या संस्थेने आपणहून मन:पूर्वक मदत करावी, त्यासाठी कोणतेही पत्र द्यावे लागले नाही, याचे मला अप्रुप होते. डॉ. नारळीकर यांच्यासारखे निर्मळ मनाचे, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व पुन्हा पाहायला मिळेल का माहीत नाही. त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.’- डॉ. सतीश आळेकर,ज्येष्ठ नाटककार
असेही डॉ. नारळीकर
राज्य शासनाने २००१ मध्ये राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला. या सक्तीविरोधात एक जनआंदोलन सुरू झाले. या आंदोलनाची तांत्रिक बाजू सांभाळण्याचे काम मी करत होतो. पुणे या आंदोलनात अग्रभागी होते. जनरेट्यापुढे माघार घेऊन राज्य सरकारने हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर एक-दोन महिन्यांत पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांनी ‘पुणेकरांनी हेल्मेट सक्तीला विरोध करून अशास्त्रीय दृष्टिकोन दाखवला आहे.’ असे विधान केले. अर्थातच माध्यमांमध्ये त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. ते वाचून मी खूपच अस्वस्थ झालो. नारळीकरांना आपली बाजू समजावून सांगायची, असे ठरवले. ‘आयुका’मध्ये फोन करून नारळीकर सरांचा ई-मेल आयडी मिळवला.
धाडस करून त्यांना एक ई-मेल पाठवून या विषयावर आमची बाजू ऐकून घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा ई-मेल ते वाचतील, अशी मला आशा नव्हती. मात्र, त्यांनी तो ई-मेल वाचून मला दुसऱ्याच दिवशी भेटीची वेळ दिली. मी उत्साहात माझ्याकडची कागदपत्रे घेऊन ‘आयुका’मध्ये गेलो. जवळपास अर्धा तास त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि शेवटी ‘भारतीय परिस्थितीत हेल्मेटचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे,’ असे उद्गार काढले. मी लगेच त्यांना आजच्या बैठकीचे सार म्हणून त्यांचे उद्गार माध्यमांना देऊ का, असे विचारल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. त्यांचा साधेपणा, दोन्ही बाजू ऐकून घेण्याची संतुलित वृत्ती आणि नंतर कुठलाही अहंभाव न ठेवता आपले मत बदलणे यामुळे त्यांची आठवण कायमची घर करून राहिली आहे.’- विवेक वेलणकर