पुणे : ‘परदेशी मालावर बहिष्कार’ या सूत्रातून स्वातंत्र्य चळवळीमध्ये असलेला आग्रह स्वातंत्र्यानंतरही कायम राहिल्याने संवादिनी (हार्मोनियम) या परदेशी वाद्यावर आकाशवाणीने बहिष्कार घातला होता. संगीत मैफलीमध्ये साथीचे प्रमुख वाद्य असलेली संवादिनी आकाशवाणीसाठी तब्बल चार दशके बहिष्कृत होती. या वाद्यावरची बंदी १९७२ मध्ये शिथिल झाली ती गायन मैफलीतील साथसंगत करण्यापुरतीच! मात्र, आकाशवाणीच्या इतिहासात प्रथमच आज, शनिवारी (३० ऑगस्ट) डाॅ. सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी या पिता-पुत्राची संवादिनी जुगलबंदी मैफल प्रक्षेपित होणार आहे.

आकाशवाणीवरून शनिवारी रात्री दहा वाजता प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय संगीत सभेमध्ये बेळगाव येथील डाॅ. सुधांशू कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी या पिता-पुत्राची संवादिनी जुगलबंदी मैफल प्रक्षेपित होत आहे. त्याआधी सात वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेमध्ये रवींद्र कातोटी यांचे १ एप्रिल २०१८ रोजी एकल संवादिनीवादन झाले होते.

‘संवादिनीचा जन्म युरोपमध्ये झाला. फ्रान्समध्ये १८४२ साली ॲलेक्झांडर डेबेन यांनी या वाद्याची रचना केली आणि त्याचे हार्मोनियम असे नामकरण केले. या वाद्यामुळे शास्त्रीय संगीताच्या शुद्धतेला बाधा पोहोचत असून, सारंगी आणि सतार या वाद्यांना धोका असल्याचा मतप्रवाह त्या वेळी होता. त्यातूनच केंद्र सरकारने संवादिनी या वाद्यावर बंदी घातली. या वाद्यावरील बंदी उठवावी, या मागणीसाठी ज्येष्ठ संवादिनीवादक पं. मनोहर चिमोटे, पं. तुळशीदास बोरकर, पं. आप्पासाहेब जळगावकर यांच्यासह पुण्यातील डाॅ. पाबळकर यांनी प्रयत्न केले. अखेरीस बॅ. विठ्ठलराव गाडगीळ माहिती आणि प्रसारणमंत्री असताना ही बंदी शिथिल झाली. एकल वादन आणि गायन मैफलीतील साथीचे वाद्य म्हणून संवादिनीला परवानगी मिळाली,’ अशी माहिती प्रसिद्ध संवादिनीवादक प्रमोद मराठे यांनी दिली.

जुगलबंदी सादर करणाऱ्यांतील सुधांशू कुलकर्णी हे प्रसिद्ध संवादिनीवादक असून, पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडे त्यांनी संवादिनीवादनाची तालीम घेतली. ते ‘गोवा काॅलेज ऑफ म्युझिक’मध्ये प्राध्यापक होते.

सांगीतिक मतप्रवाह आणि राजकारणामुळे आकाशवाणीसाठी संवादिनीवादन जवळपास चार दशके हाेत नव्हते. गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली असून, आता आम्हा पिता-पुत्राला आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेसाठी सहवादन करण्याची संधी मिळाली आहे. मी बेळगावचा असल्याने आकाशवाणी धारवाड केंद्रावर आमच्या सहवादनाचे ध्वनिमुद्रण झाले असून, शनिवारी (३० ऑगस्ट) त्याचे प्रसारण होणार आहे.- सुधांशू कुलकर्णी, प्रसिद्ध संवादिनीवादक