पुणे : नामवंत कंपनीचे फ्रीज गुजरातमधील राजकोट येथे न पोहोचविता पसार झालेल्या ट्रक चालकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून फ्रीज आणि ट्रक असा ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निसारअहमद इसाक खान (वय ३५, रा. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रांजणगाव येथील एका वाहतूकदाराचा (ट्रान्सपोर्ट कंपनी) ट्रक वाघोलीतील कटकेवाडी येथील गोदामातून नामवंत कंपनीचे १२० फ्रीज घेऊन गुजरातमधील राजकोट येथे रवाना झाला होता. मात्र, दोन दिवस झाल्यानंतर ट्रक तेथे पोहोचला. ट्रक चालकाचा मोबाइल संच बंद होता.
ट्रकचे ‘जीपीएस लोकेशन’ सुरत येथे दाखवत होते. वाहतूकदार कंपनीने चाैकशी केली. तेव्हा ट्रक चालक ट्रकसह फ्रीज चोरून पसार झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध सुरू केला. नंदुरबार येथील एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक नंदुरबार येथे रवाना झाले.
पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेव्हा ट्रक बेवारस अवस्थेत आढळला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालकाचा साथीदार निसारअहमद खान यास अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एका नंदुरबारमधील एका गावातील घरातून १२० फ्रीज जप्त केले.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त साेमय मुंढे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, स्वप्नील जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे यांनी ही कामगिरी केली.
