श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
सुसंगती सदा घडो असे म्हणण्यामागचे कारण काय ही कुसंगती मिळाल्याने झालेल्या परिणामांनंतर लक्षात येते. कुसंगतीमुळे व्यसनाधिनतेच्या गर्तेत जाण्यापासून अनेक अडचणींना त्या व्यक्तीला आणि पर्यायाने कुटुंबालाही तोंड द्यावे लागते. अशा वेळी आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची मदत घेता येऊ शकते. अशा केंद्रात जाण्यापासून व्यसनांपासून सुटका करून घेण्याचा काळ हा व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीसाठी आणि पर्यायाने कुटुंबीयांसाठीही परीक्षेचा काळ असतो. पण मनापासून ठरविल्यास व्यसनांपासून नक्कीच मुक्त होता येते ते अनेकानेक व्यसनाधीन व्यक्तींना भेटल्यानंतर जाणवते.
आनंदवन बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २००८ मध्ये झाली असून व्यसनमुक्ती, आरोग्य, शिक्षण, संस्कार, वृद्धसेवा, प्रबोधन आदी क्षेत्रांमध्ये संस्था कार्यरत आहे. संस्थेचे ऐंशी रुग्णांना व्यसनांमधून बाहेर काढण्यासाठीची क्षमता असून संस्थेने अद्ययावत व्यसनमुक्ती केंद्र आहे. त्याची स्थापना संस्थेद्वारे २००९ मध्ये करण्यात आली असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी येथे वर्षांतून दोनदा दहा दिवसांच्या विनामूल्य निवासी शिबिरांचे आयोजनही करण्यात येते. व्यसनमुक्तीच्या संदर्भात जनजागृतीसाठी वस्ती पातळीवर तसेच विविध निवासी संकुलांमधून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच दरवर्षी ३१ डिसेंबरला ‘दारु नको दूध प्या’ अभियान राबविले जाते. ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ विविध उपक्रमांद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविले जातात. शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती २६ जूनच्या ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिन’ निमित्ताने करण्यात येते.
व्यसन करणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार न करता व्यसनाचा तिरस्कार केला जावा या अनुषंगाने संस्थेमार्फत अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये गरजेच्या वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार, मानसिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, समुपदेशन, शारीरिक व्यायाम, समतोल आहार, विविध मनोरंजनात्मक खेळ, वाचन या उपक्रमांद्वारे व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या व्यक्तीवर उपचार केले जातात. उपचारादरम्यान व्यसनी व्यक्तींच्या तत्कालीन समस्या जाणून घेऊन तसेच कुटुंबासमवेत मार्गदर्शन करून व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना मानसिक आधार दिला जातो. बऱ्याच व्यसनी व्यक्तींवर उपचारांबरोबर त्यांचे पुनर्वसनदेखील येथे केले जाते. व्यसनांमुळे व्यसनी व्यक्तीच्या मुलांवर, कुटुंबावर खोल असे मानसिक परिणाम होण्याची शक्यता असते. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांचे कौटुंबिक समुपदेशन केले जाते.
येथे येणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आपला रक्ताचे नाते असणाऱ्या व्यक्तीला बळजबरीने किंवा फसवूनही येथे आणले जाते. काही वेळा ती व्यसनाधीन व्यक्तीही तेथे स्वत:हूनही येते. एखाद्या व्यक्तीची नशा जेव्हा घरच्यांना कळते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हाच हे शक्य होऊ शकते. ही उपचारपद्धती एक ते तीन महिने अशी असते. यामध्ये ढासळलेल्या शारीरिक क्षमतेबरोबरच झालेले मानसिक खच्चीकरण यातून त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. यामध्ये सुयोग्य आहार, औषधोपचार, मानसोपचारतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, समुपदेशन आदी गोष्टींचा अंतर्भाव असतो.
शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक या पातळ्यांवरचा आजार म्हणजे व्यसनाधीनता. या पाचही पातळ्यांवर काम करीत त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबीयांना उभारी देण्याचे काम केले जाते. व्यसनाधीन व्यक्तीची मानसिकता मी पितच नाही, येथपासून मी थोडेसेच पितो, मी पिऊन रस्त्यावर पडत नाही, येथपर्यंत असते. या मानसिकतेतून त्या व्यसनाधीन व्यक्तीला बाहेर काढीत सर्वात आधी आपण पितो हे मान्य करण्याच्या भूमिकेपर्यंत आणावे लागते. हे मान्य केल्याशिवाय पुढच्या उपचारपद्धती सुरूच होऊ शकत नाही. व्यसनाधीनतमुळे झालेल्या घटनांची जाणीव त्या व्यक्तीला करून दिली जाते. वेदनांची जाणीव झाल्यानंतरच विविध उपाययोजना सुरू होतात. त्यांच्या व्यसनाधीनतेची जाणीव करून दिल्यानंतर त्यांच्यातील हळूहळू बदल दिसू लागतात. औषधोपचार तसेच व्यसनांपासून लांब राहण्याचा कालावधी यातून त्या त्या व्यक्तीचे पुनर्वसन होऊ लागते. ही सर्व उपचार पद्धती त्या व्यसनाधीन व्यक्तीवर, तिच्या मानसिकतेवर अवलंबून असते. त्या व्यक्तीने केंद्रातून बाहेर जाऊन परत व्यसनांकडे जाऊ नये, यासाठी त्याची पाच टक्के मानसिकता असेल तर केंद्राकडून व्यसनांपासून दूर राहण्यासाठीची पंच्चानव टक्के तयारी करून घेतली जाते. त्या व्यक्तीला आहार, विहार, व्यायाम, छंद याबाबत मार्गदर्शन केले जाते. कुटुंबीयांनाही त्या व्यक्तीची काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले जाते. आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची मदत जर कोणाला घ्यायची असेल तर ९१३९३९२८२८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. भरलेले पोट आणि रागावर नियंत्रण, एकटेपणापासून मुक्ती, शारीरिक क्षमता वाढीसाठी व्यायाम, छंदांची मदत याबाबत व्यसनाधीन व्यक्तीला सूचना आणि मार्गदर्शन केले जाते. इतर न पिणाऱ्या व्यक्तींपासून व्यसनाधीन व्यक्ती स्फूर्ती घेऊन तसेच कुसंगतीपासून दूर राहून व्यसनांपासून दूर राहू शकते आणि निरोगी आयुष्य जगू शकते.