पुणे : कपडे, पादत्राणे विक्री व्यवसायाआड शहरातील उच्चभ्रू भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन दाम्पत्याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, कोकेन, मोबाइल संच असा एक कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उगुचुकु इम्यॅन्युअल (वय ४३), ऐनीबेली ओमामा व्हिवान (वय ३०, दोघे सध्या रा. नालंदा रेसीडन्सी,बाणेर, मूळ रा. नायजेरिया) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्याकडून ९६ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ६४४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी), ३० लाख रुपयांचे २०१ ग्रॅम कोकेन, मोबाइल संच, इलेक्ट्राॅनिक वजनकाटा असा एक कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
आरोपी उगुचकु आणि त्याची पत्नी ऐनीबेली व्यावसायिक व्हिस्सावर भारतात आले. पादत्राणे, कपडे विक्रीचा व्यवसायाआड दोघांनी शहरातील उच्चभ्रू भागात अमली पदार्थ विक्री करण्यास सुरूवात केली. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विक्री पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बाणेर परिसरात कारवाई करून दोघांना पकडले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, राहुल जोशी, नितेश जाधव, विशाल दळवी, योगेश मोहिते, रेहेना शेख आदींनी ही कारवाई केली. आरोपींनी अमली पदार्थ कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.