पिंपरी : यंदाच्या पावसाळ्यात शहरात दोनवेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २१ नैसर्गिक ओढे-नाल्यावर अतिक्रमण झाल्याचे आढळले. मुसळधार पाऊस झाल्यानंतर अनेक रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचून पुरसदृश परस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नैसर्गिक नाले, ओढ्यांवर असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

शहरामध्ये २ ते ११ मीटर रुंदीचे शंभर किलोमीटर अंतराचे १४४ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. परंतु, नाल्यांवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडचण निर्माण झाली. समाविष्ट गावे आणि नव्याने विकसित होत असलेल्या भागात नैसर्गिक नाले पाईपलाईन टाकून बुजविले आहेत. काही ठिकाणी नाल्यांवरच बांधकामे केली आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबणे, पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न होणे, लोकवस्तीत पाणी शिरणे आणि रस्त्यावर, भुयारी मार्गात पाणी साचून तळे निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे जलनि:स्सारण विभागाकडून शहरातील नैसर्गिक ओढे व नाल्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात २१ नैसर्गिक नाले, ओढ्यावर अतिक्रमण करत बांधकामे केल्याचे आढळले. यामुळे पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना यंदाच्या पावसाळ्यात घडल्या.

हेही वाचा >>>पुणेकरांना खुशखबर! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी

कमी व्यासाचे पाइप

बांधकाम व्यावसायिकांनी स्थापत्य विभागाकडून ना-हरकत दाखले घेऊन काही ठिकाणी पाईप टाकून नैसर्गिक नाले, ओढे बुजविले आहेत. भूमिगत टाकलेले पाईप कमी व्यासाचे आहेत. कमी वेळेत जास्त पाऊस होत असल्याने पाण्याचा योग्य निचरा होत नाही. सांडपाणी वाहिन्या तुंबतात. पाईपची साफसफाई होत नसल्याने पाणी वहनास अडथळा येतो. परिणामी, सखल भागात पाणी साचते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील २१ ओढे, नाल्यावर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण झाल्याचे आढळले. सांडपाणी वाहिनीत माती, दगड, कचरा आढळला. काही वाहिन्या फुटल्या आहेत. अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जलनि:स्सारण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.