शहर आणि जिल्ह्य़ात बुधवारी (२५ सप्टेंबर) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बळी गेलेल्यांची संख्या २४ झाली आहे. पाण्यात वाहून गेलेले दोघे जण बेपत्ता असून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
मुसळधार पावसाने पुणे शहर, पुरंदर, हवेली तालुक्यात हाहाकार उडाला. ओढे, नाल्यांना पूर आला. अरण्येश्वर भागातील टांगेवाला वसाहतीत एका सोसायटीची भिंत कोसळून पाच जण मृत्युमुखी पडले. मुसळधार पावसाची सर्वाधिक झळ दक्षिण पुण्याला बसली. कात्रज, पद्मावती, अरण्येश्वर, बिबवेवाडी भागातील सोसायटय़ा तसेच वसाहतीत पाणी शिरले. आंबिल ओढय़ाची भिंत मुसळधार पावसाने खचल्याने लोकवस्तीत पाणी शिरले. शहर आणि जिल्ह्य़ात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी रविवारी प्रशासनाकडून देण्यात आली.