पुणे : सिंहगड रस्त्यावरीव खडकवासला, किरकिटवाडी, नांदेड तसेच धायरी आणि परिसरातील गावांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीच्या आजूबाजूच्या भागाची स्वच्छता करण्यात आली. तसेच, या विहिरीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव आच्छादन केले जाणार आहे. विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकून त्याच्या नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, नांदेड सिटी, धायरी, आंबेगाव परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदूषित असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विहिरीच्या आजूूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून मैलापाणी विहिरीच्या पाण्यात मिसळू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना संबधितांना दिल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. शहरात १२ ठिकाणांवरून विविध भागांना टँकरने पाणी पुरविले जाते. त्यांची आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच या भागातील सोसायच्या, विहिरीतील पाणी, नागरिकांना प्रत्यक्षात मिळणारे पाण्याचीही तपासणी होणार आहे. खासगी टँकरचालकांनाही क्लोरिनच्या पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

एका क्लिकवर शुद्धीकरणाची माहिती

जीबीएसचे संशयित रुग्ण सापडलेल्या गावांना ज्या विहिरीतून पाणी दिले जाते. त्या विहिरीतील पाण्यात क्लोरिन टाकणे आणि क्लोरिनचे प्रमाण मोजण्यासाठी तेथे स्वयंचलित मीटर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाची माहिती प्रत्येक तासाला प्रशासनाला एका क्लिकवर मिळणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून, या विहिरीसाठी दोन स्वतंत्र मीटर बसविण्याचे विचाराधीन आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘निर्जंतुकीकरणाची मात्रा किती हवी, याचा अंदाजच नाही’

विहिरीत गावांसाठीचे पाणी थेट खडकवासला धरणातून सोडले जाते. त्यानंतर विहिरीतच पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. मात्र, निर्जंतुकीकरणाचे औषध पाण्यात किती हवे, हे निश्चित असले, तरी कर्मचाऱ्यांना त्याचा नेमका अंदाज येत नाही. तसेच, ते कमी जास्त होते. त्यामुळे या कामासाठी दोन नवीन टाक्या आणि स्वयंचलित यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

महापालिकेकडून टोल फ्री क्रमांक सुरू

जीबीएस बाबतच्या माहितीसाठी तसेच यावर नक्की कोठे उपचार घेता येतील, याची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महापालिकेने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये सुविधा देण्यात आली आहे. जीबीएस बाबत माहितीसाठी ०२०२५५०६८००, २५५०१२६९ आणि ६७८०१५०० या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येणार आहे. हे क्रमांक २४ तास सुरु राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावांना पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीत मैलापाणी मिसळू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. या भागातील मैलापाणी वाहिन्यांची स्वच्छता जेटिंग मशीनच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरच्या पाण्याची तपासणीदेखील केली जाणार आहे. या भागातील नागरिकांना मेडिक्लोअर दिले जात आहे. २० हजार बाटल्यांचे वाटप केले जाणार आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.