पिंपरी : आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे मतभेद, मनभेद न होऊ देता एकजुटीने लढत मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचाच खासदार दिल्लीत पाठविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी समन्वय बैठकीत केला.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक पार पडली. मावळचे संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, माकप शहराध्यक्ष गणेश जरांडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे मेट्रो सुसाट! वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गिकेला राज्य सरकारची मान्यता

मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटण्याचे निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार वाघेरे यांनीही प्रचाराला सुरुवात केली. परंतु, त्यांच्या प्रचारात महाविकास आघाडी दिसत नव्हती. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अहिर यांनी तातडीने शहरात दाखल होत घटक पक्षांची समन्वय बैठक घेतली. केंद्रातील सरकार दडपशाहीचे धोरण राबवत आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. देशाच्या हितासाठी आपल्याला या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करावे लागणार आहे. त्याकरिता आपण सर्व एकत्रित आलो आहोत. लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. त्याकरिता मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. सर्वांनी एकजुटीने काम करावे. घरोघरी पोहचावे. मनभेद, मतभेद होऊ देऊ नयेत, सर्वांना विश्वासात आणि सोबत घेऊन प्रचार करण्याच्या सूचना आमदार अहिर यांनी केल्या.

तत्वांसाठी पक्षत्याग

खासदार श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. ते जर मतदारसंघातील नागरिकांना ओळखत नसतील तर ही शोकांतिका आहे. त्यांना समजले पाहिजे की ते कुणाबद्दल बोलत आहेत. कारण, मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. माझे मूळ गाव, जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पिंपरीगाव आहे. ते चुकीचे बोलत आहेत, असे म्हणत वाघेरे यांनी बारणे यांना खोचक टोला लगावला. त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. आम्ही तत्वांसाठी पक्ष सोडला, असेही त्यांनी म्हटले आहे.