पुणे : स्वा.वि.दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खडग’ या नाटकाचा पुणे शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रयोग सुरू होता. पण या नाटकात जगाला शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करीत वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात घुसून आंदोलन केले. यामुळे नाट्यगृह परिसरात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले. तर या नाटकाचा भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी या प्रयोग पाहण्यास आल्या होत्या.
या आंदोलना बाबत वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे म्हणाले, स्वा.वि.दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खडग’ या नाटकाचा कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रयोग सुरू होता. नाटक संपण्याच्या अर्धा तासापूर्वी गौतम बुद्ध यांच्या बाबत चुकीचा संदर्भ दाखविण्यात आला. ही बाब स्पष्ट होताच, आमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करित आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले, गौतम बुद्ध यांच्या बाबत आम्ही कधी अवमान खपवून घेणार नाही. त्यामुळे आज आंदोलनाच्या माध्यमांतून पुण्यातील प्रयोग बंद पाडला असून याची दखल आयोजकांनी घ्यावी, तसेच या नाटकाचे प्रयोग राज्यभरात कुठेही होऊ देणार नाही. तसेच या प्रकरणी संबधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.