पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दसऱ्यानिमित्त फूल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना फूल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कोणतेही शुल्क न आकारता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यासाठी फुलांना मोठी मागणी असते. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला विभागाच्या समोरील शेतीमाल वाहतूक करणाऱ्या गाड्या लावल्या जातात. तेथील जागा फूल विक्रेत्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. या वेळी भाजीपाला विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे उपस्थित होते.
हेही वाचा >>> नवरात्रोत्सवात नारळांना मागणी; दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक
या जागेवर शेतकरी नसलेली व्यक्ती फूल विक्री करु शकते. मात्र, त्यांच्याकडून दिवसाला एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. बाजारातील अडते फूल विक्री करु शकतात. त्यांना नियमाप्रमाणे बाजार कर (सेस) भरावा लागणार आहे. दसऱ्याला झेंडू, शेवंतीसह विविध प्रकारच्या फुलांना मागणी असते. दरवर्षी शेतकरी मार्केट यार्डातील शिवनेरी रस्ता, भुसार बाजार परिसरात गाड्या लावून फुलांची विक्री करतात. शिवनेरी रस्त्यावर कोंडी होत असल्याने बाजार समितीने फूल विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. ठरवून दिलेल्या ठिकाणी फूल विक्रीस परवागनी देण्यात आली आहे. मार्केट यार्डातील फूल बाजारातील व्यापारी दरवर्षी प्रमाणे व्यापार करणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> पुणे : पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान ; कांदा, टोमॅटो, मिरची, फ्लॅावर, कोबी, मटार महाग
बाजार समितीच्या आवारातील प्रवेशद्वार क्रमांक सातजवळ गुरांचा बाजार आहे. तेथील जागेत आंब्याच्या हंगामात तात्पुरते छत उभे करुन आंबा विक्रीस परवानगी दिली जाते. यंदा दसऱ्यापर्यंत या जागेत शेतीमालाचे ट्रक लावण्यास मुभा देण्यात आली आहे. तेथे शेतीमाल वाहतूक करणारे ट्रक लावावेत, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
दसऱ्यानिमित्त शेतकऱ्यांना फूल विक्रीसाठी बाजार समितीकडून कोणतेही शुल्क न आकारता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पिकांची नोंद असलेला सात-बारा उतारा आणि आधारकार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
– मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती