प्रवेशामागील अर्थकारण प्राप्तिकर खात्याच्या रडारवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

िपपरीतील बहुचर्चित डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी सकाळी सात वाजता छापा टाकला आणि रात्री दहा वाजेपर्यंत संस्थेच्या कागदपत्रांची कसून छाननी सुरू होती. पाच वर्षांपूर्वी अशाच पध्दतीने छापासत्र झाले होते. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे या छापासत्रातून नेमके काय उघड होणार, याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. या विद्यापीठाच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन ‘बहाल’ करण्यात येणाऱ्या पदव्युत्तर व मानद पदव्या तसेच विद्यापीठाच्या महाविद्यालयांतील प्रवेशामागील देणग्यांचे ‘अर्थकारण’ प्राप्तिकर खात्याच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे जावई डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडे संस्थेच्या िपपरी प्रांताची सुभेदारी आहे, तर आकुर्डीतील संस्थेच्या इमारती माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाटणीला आल्या आहेत. िपपरीतील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक साम्राज्याचे सर्वेसर्वा असलेले डॉ. पी. डी. पाटील मूळचे दापोडीचे रहिवासी, नंतर त्यांनी तुकारामनगर येथे वास्तव्य केले आणि पुढे कोरेगावला स्थायिक झाले. सुरुवातीच्या काळात डॉ. पी. डी. पाटील यांनी बजाज ऑटो कंपनीत नोकरी केली. नंतर पूर्णवेळ संस्थेचा कार्यभार हाती घेतला. रामराव आदिक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअिरग असे संस्थेचे नाव पुढे बदलण्यात आले आणि डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान असे नामकरण झाले. चांगल्या प्रकारची शैक्षणिक सुविधा शहरात उपलब्ध झाल्याने पुणे, िपपरीसह राज्यातील तसेच देशातील विद्यार्थ्यांचा ओघ या ठिकाणी सुरू झाला. तेथूनच प्रवेशासाठी ‘देणग्यांचे अर्थकारण’ सुरू झाले. एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवीसाठी लाखो रुपयांची बोली आजही लागते, हे उघड गुपित असून वर्षांनुवर्षे सगळा कारभार बिनबोभाट चालत राहिला. शहरातील नेते म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी, विद्यार्थी नेते, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी डॉ. पी. डी. पाटील यांचे ‘लाभार्थी’ होते. त्यामुळेच इतक्या वर्षांत स्थानिक पातळीवर त्यांना कधी अडचणी आल्या नाहीत.

मराठी साहित्य संमेलन िपपरीत होणार, याची घोषणा होताच पाटलांचे प्रतिष्ठान साहित्य वर्तुळातही चर्चेत आले. नेहमीच्या पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या साहित्य संमेलनाला फाटा देत ‘कॉर्पोरेट’ पध्दतीने झालेले संमेलन खूपच खर्चिक झाले. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. या पैशाचा हिशेब शेवटपर्यंत जाहीर करण्यात आला नाही.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विशेषत: पवारांच्या निकटवर्तीय असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी ‘उत्तम’ संबंध असतानाही अशाप्रकारे छापासत्राला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने या छापासत्रामागे कोण, या चर्चेलाही उधाण आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dy patil pimpri is on income tax department
First published on: 28-07-2016 at 05:16 IST