पुणे : राज्यात ‘ई बाइक टॅक्सी’ धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून (आरटीओ) मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये या ‘ई बाइक टॅक्सी’ दुचाकीला १५ किलोमीटर अंतराचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे १५ किलोमीटर परिघातच ही सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवड्याभरात ‘एसओपी’चा मसुदा तयार करून राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरीनंतर राज्यातील निवडक शहरांमध्ये हे धोरण राबवण्याचे नियोजन आहेे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ‘ई बाइक टॅक्सी’ धोरण हे पर्यावरणपूरक आहे. तसेच अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासह शहरांतर्गत माफक दरात सुलभ प्रवास, गतिशील दळणवळणाच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘ई बाइक टॅक्सी’ धोरणाला मंजुरी दिली. या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाकडून आता मानक कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले, ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशाला शेवटच्या मैलापर्यंत सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठीच्या उद्देशाने ‘ई बाइक टॅक्सी’ची कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे. विशेषत: ही इलेक्ट्रिक बाइक असल्याने दुचाकीची क्षमता, ऊर्जा स्थानके (चार्जिंग स्टेशन) आणि सुरक्षितता यानुसार दुचाकीसाठी १५ किलोमीटरच्या सेवेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या सेवेवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने उपयोजन (अॅप) विकसित करण्यात येत आहे.’ ‘संपूर्ण राज्यासाठी लवकरच एकीकृत धोरण जाहीर केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने ‘ई बाइक टॅक्सी‘साठी प्रति किलोमीटर आधारित ऊर्जेचा वापर, त्यानुसार दरनिश्चिती, ऊर्जा स्थानके, उत्पादन कंपन्यांची क्षमता आणि खर्च यांचे मूल्यांकन करून दरनिश्चिती करण्यात येईल. एकाच वेळी ५० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना प्रवासी वाहतुकीचा परवाना, महिला सुरक्षिततेसाठी नियमावली, आच्छादन सुविधा, आरक्षण प्रणाली अशा घटकांचा मसुद्यात समावेश करण्यात येणार आहे,’ असेही भीमनवार यांनी स्पष्ट केले.

‘ई बाइक टॅक्सी’साठी उपयोजन (अॅप) तयार करण्यात आले असून, त्यानुसार मार्गनिश्चिती करण्यात येईल. दुचाकीसाठी १५ किलोमीटरपर्यंतच सेवा मर्यादित करण्यात येणार आहे. धोरणाची अंमलबजावणी दोन महिन्यांत सुरू करण्याचे नियोजन आहे.– विवेक भीमनवार, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रिक बाईकपुरते धोरण मर्यादित ठेवल्याने अवलंब मंदावू शकतो. त्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची उत्पादनक्षमता आणि वाहतूक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. काटेकोर अंमलबजावणी आणि सातत्य राखल्यास ‘ई बाइक टॅक्सी’ धोरण उपयुक्त ठरेल.– बाबा शिंदे, अध्यक्ष, माल आणि प्रवासी वाहतूक संघटना