येथील ‘आदर प्रतिष्ठान’ तर्फे भोर येथील निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शैक्षणिक सुविधेसह शाळेला क्रीडा साहित्य देण्याचा आणि शिक्षकांच्या खास सत्काराचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला.
आदर प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल माने, शाळेचे मुख्याध्यापक शरद जाधव तसेच साईदिशा माने, बाळासाहेब फडणवीस, दादा पुजारी, विकास देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. संस्थेतर्फे भोर येथे चालणाऱ्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निगचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच, त्यासाठी आवश्यक असलेले संगणक व अन्य सर्व यंत्रसामग्री प्रतिष्ठानतर्फे शाळेला भेट देण्यात आली. त्या बरोबरच विविध खेळांचे संचही विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मन:पूर्वक काम करणाऱ्या शिक्षकांचा खास सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. त्यात स्वाती गोखले, वनीता बागूल, सुखदा कानडे, संदेश पवार, बहुलेकर आणि दबडे या शिक्षकांचा सत्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला. समाजासाठी चांगल्या पद्धतीने आणि मनापासून काम करणाऱ्या शिक्षकांचे काम समाजापुढे यावे, त्यांचे कौतुक व्हावे या उद्देशाने हा सत्कार करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.