पुणे : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडीबाबतची कागदपत्रे सादर करण्यास शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता २० सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत खासगी शाळांतील ८३ टक्के शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत.

नागपूर विभागात बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीबाबत नवी कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांची २०१२ ते २०२५ या काळातील कागदपत्रे शालार्थ संकेतस्थळावर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, शालार्थ मान्यतेचे आदेश अशा कागदपत्रांचा समावेश होता. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देत संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. ही मुदत नुकतीच संपली.

या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी विभागीय मंडळ अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. त्यात, सद्य:स्थितीत ८३ टक्के कामकाज डीडीओ -१ यांच्या स्तरावर पूर्ण झाले आहे. आता २० सप्टेंबरपर्यंत डीडीओ १ तथा मुख्याध्यापक यांच्या लॉग इनमधून कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. कागदपत्रे सादर करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शालार्थ प्रणालीमध्ये कागदपत्रे सादर करण्याच्या कामकाजाकडे विशेष लक्ष देण्यात यावे,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.