पुणे : राज्यातील एक हजार मंडळांमधील एकही ढोल-ताशा वादक बेरोजगार राहणार नाही, म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. ‘पथकातल्या तरुणांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून ढोल-ताशा पथकांनीही प्रयत्न करायला हवेत,’ अशी अपेक्षा पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.
ढोल-ताशा महासंघातर्फे आयोजित ‘ढोल-ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशना’चे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, ॲड. प्रताप परदेशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. राजेश सुपेकर या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘वाद्यांच्या वादनाने माणसाला आत्मिक समाधान प्राप्त होते. राज्यातील वाद्यांची परंपरा मोठी आहे. ती काळासोबत विकसित होत गेली. वेगवेगळ्या वाद्यांचा समावेश विविध प्रकारच्या वादनांमध्ये होत गेला. आता ढोल-ताशा पथकांनीही वेगवेगळ्या वाद्यप्रकारांचा समावेश पथकांमध्ये करावा.’
बावनकुळे म्हणाले, ‘ढोल-ताशा परंपरेचा उगम पुण्यात झाला. मात्र, ढोल-ताशांचे वादन ही राज्याची सांस्कृतिक अस्मिता झाली आहे. त्यांच्या वादनाने चैतन्य निर्माण होते. मनामध्ये अभिमान आणि उत्साह संचारतो. महाराष्ट्राचा हा गजर देशातच नव्हे तर जगात पोहोचवायचा आहे. ढोल-ताशा हा आपल्या सांस्कृतिक उत्सवाचा आत्मा आहे. त्यामुळे हा अनमोल ठेवा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.’पथकांच्या अधिकाधिक मागण्या मान्य होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,‘राज्यात एक हजार ढोल-ताशा पथके असून दीड लाख वादक वादन करीत आहेत. या तरुणांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले तर, नैसर्गिक संकटांच्या काळात हे तरुण कामी येतील.’ॲड. शिरीष थिटे यांनी सूत्रसंचालन केले.
ढोल-ताशा पथकांच्या मागण्या
- ढोल-ताशा वादनाला खेळ म्हणून मान्यता मिळावी
- विविध मिरवणुकींमध्ये वादनासाठी परवानगी देण्यात यावी
- नदीकाठ, महापालिका किंवा सरकारच्या मोकळ्या जागा वादकांना सरावासाठी मिळाव्यात
- क्रीडा स्पर्धांंच्या उद्घाटन कार्यक्रमात ढोल-ताशांचे वादन व्हावे
- गणेशोत्सवाच्या दीड महिना आधी वादनाला संध्याकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत परवानगी असावी